भाजपाच्या आठ नावांवर शिक्कामोर्तब

By admin | Published: December 3, 2014 03:49 AM2014-12-03T03:49:46+5:302014-12-03T03:49:46+5:30

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातील भाजपाच्या मंत्र्यांच्या नावाची चर्चा पूर्ण झाली असून, त्या नावांवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिक्कामोर्तब केले

Seeking the names of BJP's eight nominees | भाजपाच्या आठ नावांवर शिक्कामोर्तब

भाजपाच्या आठ नावांवर शिक्कामोर्तब

Next

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातील भाजपाच्या मंत्र्यांच्या नावाची चर्चा पूर्ण झाली असून, त्या नावांवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिक्कामोर्तब केले असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र रात्री उशिरापर्यंत त्यावर मंजुरी कळविली नव्हती.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात २० मंत्र्यांना शपथ दिली जाण्याचे संकेत आहेत. यातील १२ शिवसेनेचे व ८ भाजपाचे असतील. भाजपा समर्थित २ अपक्षांनाही स्थान देण्यावर उभयपक्षी चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याचे समजते. अपक्षांच्या नावाचा विचार अधिवेशनानंतरही केला जाऊ शकतो, असा प्रस्ताव पुढे आला आहे. नागपूरमार्गे मंगळवारी राजधानीत दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांच्याशी दोन तास चर्चा केल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बंगला गाठला. गडकरी त्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. त्यामुळे त्यांची त्यांनी वाट बघितली. त्यांच्या भेटीमध्ये काही नावांवर चर्चा झाल्यावर फडणवीस यांनी मोदी यांची भेट ठरविल्याचे सूत्राने सांगितले. भाजपाच्या कोट्यातून रामदास आठवले यांच्या गटाला राज्यमंत्रिपद मिळणार आहे, मात्र ते स्वीकारण्याचा निर्णय आठवले यांनाच करायचा आहे. दिवसभराच्या वेगवान घडामोडींनी शिवसेनेत उत्साह आला असून, भाजपाबद्दल कोणतीही भूमिका विचारपूर्वक मांडण्याच्या स्पष्ट सूचना संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयात देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी नागपूर दौरा होता. मात्र शिवसेना सकारात्मक पावले उचलत असल्याचे दिसल्याने त्यांना दिल्लीला बोलाविण्यात आले. चारच्या दरम्यान त्यांनी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात शहा यांची भेट घेतली, त्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Web Title: Seeking the names of BJP's eight nominees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.