सीमा हैदर घुसखोरी प्रकरणी मोठी अपडेट! SSB ने केली धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 10:43 AM2023-08-05T10:43:00+5:302023-08-05T10:43:22+5:30
सीमा हैदरचा भारतातील प्रवेश हे एक कोडंच होऊन बसलं आहे
Seema Haider Update: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हे भारतीय तपास यंत्रणांसाठी आतापर्यंत न सुटलेले कोडं आहे. सीमा हैदर तिच्या चार मुलांसह भारतात कशी आली याचा तपास सुरू आहे. या दरम्यान, एसएसबीने आपल्या दोन जवानांना निलंबित केले आहे. सीमा आणि तिची मुले नेपाळमार्गे भारतीय हद्दीत घुसलेल्या बसची या दोन जवानांनी तपासणी केल्याचे वृत्त होते. मिळालेल्या माहितीनुसार, SSB च्या 43 व्या बटालियनचे इन्स्पेक्टर सुजित कुमार वर्मा आणि हेड कॉन्स्टेबल चंद्र कमल कलिता यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही जवानांवर निष्काळजीपणाच्या आरोप ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
SSB ने कडक कारवाई केली
सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली होती. भारत आणि नेपाळची सीमा खुली आहे आणि तिचे रक्षण एसएसबी म्हणजेच सशस्त्र सीमा बल करते. त्यामुळेच सीमा हैदरच्या भारतात प्रवेशाची एसएसबी चौकशी करत होती. याप्रकरणी दोन्ही जवानांचा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सीमा राजकारणाच्या मैदानात उतरणार?
सीमा तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. तिची आणि सचिनची प्रेमकहाणी अजूनही चर्चेत आहे. यातच, सीमा हैदर राजकारणाच्या मैदानात नवी इनिंग सुरू करणार असल्याची बातमी पसरली आहे. एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सीमा हैदर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात आले. सीमा हैदरने हे निमंत्रण स्वीकारले असून ती निवडणुकीच्या मैदानात उतरू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, हे प्रकरण चर्चेत येण्याआधीच रामदास आठवलेंचा खुलासा समोर आला. पक्षाचा असा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमा हैदर यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यांना तिकीट द्यायचेच असेल तर आम्ही त्यांना भारतातून पाकिस्तानचे तिकीट देऊ, मात्र येथे पक्षाचे तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.