पाकिस्तानातील पती गुलाम हैदरमुळे सचिन-सीमाच्या वाढल्या अडचणी; द्यावे लागणार 6 कोटी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:28 PM2024-03-05T13:28:55+5:302024-03-05T13:37:32+5:30
प्रेमात पडल्यानंतर प्रियकर सचिन मीणाला भेटण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेच्या अडचणी आता आणखी वाढू शकतात.
PUBG गेम खेळताना प्रेमात पडल्यानंतर प्रियकर सचिन मीणाला भेटण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेच्या अडचणी आता आणखी वाढू शकतात. सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन यांना सीमा हैदरचा पहिला पाकिस्तानी पती गुलाम हैदर याने भारतीय वकिलामार्फत प्रत्येकी 3-3 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे.
गुलाम हैदर यांचे भारतातील वकील मोमीन मलिक यांनी ही नोटीस पाठवली आहे. एवढंच नाही तर मोमीन मलिकने सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांना 5 कोटी रुपयांची नोटीसही पाठवली आहे. नोटीस पाठवून तिघांनीही माफी मागावी व दंडाची रक्कम महिनाभरात जमा करावी, अन्यथा तिघांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मलिक यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाची माहिती देताना गुलाम हैदरचे वकील मोमीन मलिक म्हणाले की, सीमा हैदरला पोलिसांनी अटक केली तेव्हा तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये सीमा हैदर ही गुलाम हैदरची पत्नी असल्याचं आढळून आलं.
नोटीसमध्ये म्हटलं आहे की, सीमाला कोर्टातून जामीन मिळाला तेव्हा सीमा हैदर, पत्नी गुलाम हैदर असं लिहिलं होतं. तिने स्वतःचं वर्णन गुलाम हैदरची पत्नी असं केलं आहे पण तरीही तिचे वकील एपी सिंह सीमा हैदरला सचिनची पत्नी म्हणून संबोधत आहेत, ते हे कोणत्या आधारावर हे बोलत आहेत? याच कारणामुळे सीमा हैदरचा पती गुलाम हैदरने एपी सिंह यांच्या विरोधात पाच कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे, जी पाकिस्तानी चलनात 15 कोटी रुपये आहे.
सचिनला दिलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये वकील मोमीन मलिक यांनी विचारले आहे की सचिन कशाच्या आधारावर सीमाला आपली पत्नी म्हणत आहे तर गुलाम हैदर आणि सीमा हैदर यांचा कायद्यानुसार आजपर्यंत तलाक झालेला नाही. गुलाम हैदरच्या वकिलाने सांगितले की, सचिनमुळेच त्याची चार मुलं वडिलांपासून विभक्त झाली आहेत. सचिन हे सीमा हैदरसोबत बेकायदेशीरपणे राहत असल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे, त्यामुळे गुलाम हैदर यांनी सीमाचा प्रियकर सचिनला 3 कोटी रुपयांची मानहानीची नोटीसही पाठवली आहे.
सीमा हैदरला पाठवलेल्या 3 कोटी रुपयांच्या कायदेशीर नोटीसमध्ये गुलाम हैदर यांनी म्हटलं आहे की, तिने कोणत्याही देशात कायदेशीररित्या त्याच्याकडून तलाक घेतलेला नाही, मग ती कोणत्या आधारावर सचिनचं नाव घेत आहे. सीमा हैदर सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर स्वत:ला सचिनची पत्नी असल्याचं का म्हणत आहेत, असा सवालही गुलाम हैदरने उपस्थित केला आहे.