Seema Haider : "माझं नाव मरियम खान...", पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकरणात नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 04:12 PM2023-07-19T16:12:29+5:302023-07-19T16:21:04+5:30
Seema Haider : पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेची चौकशी सुरू आहे.
पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेची चौकशी सुरू आहे. तिच्याबद्दल अनेक प्रश्न कायम आहेत. ती एकटी नाही तर चार मुलांसह भारतात आली आहे. ती ग्रेटर नोएडा येथे सचिन मीणा नावाच्या व्यक्तीच्या घरी राहत होती. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्याचा दावा सीमा आणि सचिन यांनी केला आहे. नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात त्यांनी लग्न केल्याचं देखील म्हटलं आहे. यूपी एटीएस या दोघांना प्रश्न विचारत आहे.
सोशल मीडियावर काही लोक म्हणतात की सीमा हैदर ही सामान्य महिला नसून पाकिस्तानी गुप्तहेर आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण प्रेमकहाणीचे आहे की कट, हे लवकरच कळेल. सीमा सांगते की, PUBG गेम खेळताना तिचे आणि सचिनचे प्रेम झाले. दोघेही पूर्वी एकत्र खेळ खेळायचे. मग फोनवर बोलू लागले. दोघेही व्हिडीओ कॉल करत असत.
PUBG गेममध्ये सीमा हैदरचे नाव काही वेगळच होते. सीमाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. सीमाने सांगितले की, तिने मरियम खान नावाने आपला आयडी बनवला होता. कारण इथे सोशल मीडियावर मुलींचं खरं नाव लिहिणं योग्य मानलं जात नाही. सीमाने मुलाखतीत खेळातील सर्व बारकावेही सांगितले. ती म्हणाली की, ती रात्री खेळायची आणि हळूहळू तिला यामध्ये मजा येऊ लागली.
2020 मध्ये खेळ खेळताना सचिनला भेटली. सर्वप्रथम त्याच्याशी मैत्री केली. पुढे प्रेमात पडले. तिचं नाव मरियम खान नसून सीमा हैदर असल्याचं तिने सचिनला नंतर सांगितलं होतं असंही सीमाने सांगितलं. सीमाने सांगितले की, या गेममध्येच चॅटिंगचा पर्याय देखील आहे. सचिन मला भारत दाखवायचा आणि मी त्याला पाकिस्तान दाखवायचे, असंही ती म्हणाली. दोघांमध्ये खूप चर्चा व्हायची.
सीमा हैदरची सध्या चौकशी सुरू आहे. ज्यामध्ये ती दिल्ली एनसीआरच्या अनेक मुलांशी बोलायची. काही मुलं इतर राज्यांतलीही होती. PubG या ऑनलाइन गेमद्वारे ती या सर्वांच्या संपर्कात आल्याचं समोर आलं आहे. आयबीने काही माहिती पाठवल्याचे बोलले जात आहे. एटीएस तिचा पासपोर्ट, आधार कार्ड आणि मुलांशी संबंधित कागदपत्रे तपासत आहे. सीमाच्या तुटलेल्या फोनमधील डेटाही तपासला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.