"मी हिंदू आहे, जे करायचं ते करा"; भारतात आलेल्या सीमा हैदरने पाकिस्तानला दिलं जोरदार उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 02:41 PM2023-07-16T14:41:04+5:302023-07-16T14:50:05+5:30
पाकिस्तानला परत पाठवण्याच्या चर्चेदरम्यान सीमाने एका व्हिडिओ मेसेजमध्ये पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं आहे.
पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात अवैधरित्या घुसलेली सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. पती गुलाम हैदरला सोडून तिने आता नोएडा येथील रब्बूपुरा येथे सचिन मीणाला पती म्हणून स्वीकारले आहे. पाकिस्तानला परत पाठवण्याच्या चर्चेदरम्यान सीमाने एका व्हिडीओ मेसेजमध्ये पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं आहे.
सीमा हैदर म्हणाली, "माझा हा एक व्हिडीओ पाकिस्तानमधील लोकांसाठी आहे. हवे तितके गंभीर आरोप लावा. हवा तितका कट रचा. येथील एजन्सी सर्वकाही क्लिअर करत आहे. मी इथे क्लिअर होताच मी माझा पती सचिनसोबत राहीन आणि त्याच्यासोबतच जगेन आणि त्याच्यासोबतच मरेन."
सीमा हैदर म्हणते की, आता ती भारताला आपला देश मानते. सचिन तिचा नवरा आहे. नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरात लग्न झाल्याचा दावा सीमा आणि सचिन यांनी केला आहे. सीमा हैदरने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, "कोणी काहीही म्हणा... हे होऊ शकत नाही. कारण माझे प्रेम, माझे सर्वस्व माझा सचिन आहे. त्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. हो, मी हिंदू आहे, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. मी भारतात आले, बघा एक दिवस सगळे माझे प्रेम स्वीकारतील."
सचिनचे कुटुंबीय आता सीमा हैदरला कोणालाही भेटू देत नाहीत. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सीमा हैदर 24 तासांपैकी 18 तास मीडिया आणि सोशल मीडियाच्या लोकांना भेटत आहे, त्यामुळे तिला वेळेवर जेवण करता आले नाही. झोपही येत नव्हती. सतत बोलत असताना तिची प्रकृती खालावली. सचिनच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.