सीमा हैदरने PM नरेंद्र मोदी आणि CM योगी आदित्यनाथ यांना पाठवली राखी, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 03:14 PM2023-08-22T15:14:40+5:302023-08-22T15:15:36+5:30
सीमाने नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवतांसह अनेक नेत्यांना राखी पाठवल्याची माहिती दिली.
Seema Haider: गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून अवैधमार्गे भारतात आलेल्या सीमाने सचिन मीणासोबत लग्न केले आणि हिंदू धर्मही स्वीकारला. आता ती हिंदू सणही साजरे करताना दिसत आहे. अलीकडेच तिने तीज आणि नागपंचमीचा सण साजरा केल्यानंतर आता राखीपौर्णिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भारतातील अनेक बड्या नेत्यांना राखी पाठवली आहे.
स्वत: सीमाने व्हिडिओ जारी करुन याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये सीमाने पोस्टल स्लिप दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना राखी पाठवल्याची माहिती दिली. तसेच, या सर्वांना माझे भाऊ असल्याचे म्हटले आहे.
त्या सर्वांनी मला धाकटी बहीण मानून राखी स्वीकारावी आणि रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर हातात बांधावी अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. यासोबतच सीमा म्हणाली की, मला वकील एपी सिंह यांनाही राखी बांधायची आहे. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी मनापासून त्यांचा आदर करते. सीमा हैदरने व्हिडिओमध्ये जय श्री रामचा नाराही दिला.
सीमा भारतातील प्रत्येक सण साजरा करत आहे
सीमा हैदर भारतात आल्यापासून सर्व हिंदू सण साजरी करत आहे. 15 ऑगस्ट असो किंवा तीज, सीमा हैदर प्रत्येक खास प्रसंगा उत्साहात साजरा करत आहे. अलीकडेच तिचा नागपंचमी साजरी करतानाचा व्हिडिओही समोर आला होता.