६४५ किमी अयोध्या अंतर, पायी वारी करत रामदर्शन घेणार; सीमा हैदरने मागितली योगींकडे परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 05:55 PM2024-02-15T17:55:14+5:302024-02-15T17:55:59+5:30
Seema Haider To Visit Ayodhya For Ram Lala Darshan: सीमा हैदरने अनेकदा अयोध्येला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Seema Haider To Visit Ayodhya For Ram Lala Darshan: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामभक्त रामललाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. यातच आता सीमा हैदरने रामललाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे परवानगी मागितल्याचे समजते.
सीमा हैदरला भारतीय नागरिक बनवण्याचा प्रयत्न करणारे आणि तिचा खटला लढणारे वकील एपी सिंह यांनी सांगितले की, सीमा हैदरला नोएडामधील तिच्या गावापासून अयोध्येपर्यंत चालत जाऊन रामदर्शन घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची परवानगी मागितली आहे, असे एपी सिंह यांनी सांगितले. सीमा हैदरला रामललाच्या दर्शनासाठी ६४५ किलोमीटरचा पायी प्रवास करून अयोध्येला जायचे आहे.
६४५ किमी अयोध्या अंतर, पायी वारी करत रामदर्शन घेणार
सीमा हैदरला संपूर्ण कुटुंबासह अयोध्येतील श्रीराम मंदिरात जायचे आहे. सचिन नोएडातील रबुपुरा गावात सीमा हैदरसोबत राहतो. त्यांच्या घरापासून अयोध्या राममंदिर सुमारे ६४५ किलोमीटर अंतरावर आहे. यासाठी सीमा हैदर तिचे वकील एपी सिंह यांची मदत घेत आहेत. यापूर्वीही सीमा हैदर तिचा पती सचिन मीणासोबत वेगवेगळ्या सणांना पूजा करताना दिसली आहे. हिंदू प्रथा खूप आवडतात. श्रीकृष्ण आणि भगवान शिवाची पूजा करायला आवडते. पाकिस्तानमध्ये राहूनही गुपचूप पूजा करत असे, असा दावा सीमाने मीडियाशी बोलताना केला होता. तसेच हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा सीमा हैदरकडून केला जातो.
दरम्यान, सीमा हैदरने अनेकदा अयोध्येला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी योगी सरकारकडे परवानगी मागितली आहे. योगी सरकार सीमा हैदरला रामलला दर्शनासाठी पायी जाण्याची परवानगी देते की नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.