सीमा हैदरची दुसऱ्या दिवशीही कसून चौकशी, ७० हजाराचा मोबाईल खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 06:57 AM2023-07-19T06:57:01+5:302023-07-19T06:57:35+5:30
भारतात येण्यापूर्वी ७० हजार रुपये किमतीचा मोबाइल फोनही खरेदी केला होता, असे तिने चौकशीत सांगितले.
नोएडा : पब्जी गेमच्या माध्यमातून झालेल्या प्रेम प्रकरणातून पाकिस्तानातून थेट भारतात आलेल्या सीमा हैदरची सलग दुसऱ्या दिवशीही दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. भारतात येण्यापूर्वी ७० हजार रुपये किमतीचा मोबाइल फोनही खरेदी केला होता, असे तिने चौकशीत सांगितले.
सीमाने मे महिन्यात बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. आता ती तिचा भारतीय प्रियकर सचिन मीणासोबत ग्रेटर नोएडा येथे राहत आहे, असे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएसने सीमाचा प्रियकर सचिन यालाही चौकशीसाठी सोबत नेले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने सोमवारी प्रथम सीमा आणि सचिन यांची नोएडा येथील कार्यालयात चौकशी केली आणि रात्री उशिरा त्यांना घरी पाठवले. सीमा (३०) आणि सचिन (२२) यांना पोलिसांनी ४ जुलै रोजी अटक केली; न्यायालयाने ७ जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला.
कसे आले एकत्र?
२०१९ मध्ये ऑनलाइन पब्जी खेळत असताना दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. फोन नंबरची देवाणघेवाण केली. तासनतास ते बोलू लागले. जानेवारी २०२१ मध्ये दोघांनी आपले प्रेम व्यक्त केले. त्यानंतर सीमा ४ जुलै रोजी नेपाळमार्गे चार मुलांना घेऊन भारतात आली.