पाकला जाणारे अणुसाहित्य जप्त; न्हावा-शेवात पकडला २२ हजार काेटींचा साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 05:05 AM2024-03-03T05:05:35+5:302024-03-03T05:05:52+5:30
हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्याने खळबळ उडाली. तपासणीत संगणक संख्यात्मक नियंत्रण (सीएनसी) मशिन सापडले आहे.
मुंबई/नवी मुंबई : चीनमधून कराचीकडे जाणाऱ्या जहाजातून पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी वापरता येऊ शकतील, अशा संशयास्पद २२ हजार १८० किलोग्रॅम साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रात सुरक्षा यंत्रणांनी पकडला. हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्याने खळबळ उडाली. तपासणीत संगणक संख्यात्मक नियंत्रण (सीएनसी) मशिन सापडले आहे.
चीनमधील तैयुआन माइनिंग इम्पोर्ट ॲण्ड एक्स्पोर्ट कंपनीने हा माल पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनीअरिंगच्या नावाने पाठविला होता. ही कारवाई २३ जानेवारी २०२४ रोजी केली असली, तरी युरोप आणि अमेरिकेतून प्रतिबंधक अणुसाहित्य पाकिस्तान छुप्या मार्गाने चीनमधून मागवत असल्याचा खुलासा झाला स्थानिक अधिकाऱ्यांनी ही कारवाई बंदरात नव्हे तर भरसमुद्रात केल्याचे म्हटले आहे.
पकडलेल्या मशिनचा वापर पाकिस्तान त्यांच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांत करू शकतो, असा संशय यंत्रणांना आहे. ते इटालियन कंपनीने बनवलेले कॉम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल मशीन आहे. यामध्ये आण्विक आणि क्षेपणास्राशी संबंधित भाग सापडले.
भारतीय बंदरातून वाहतूक
फेब्रुवारी २०२० मध्ये, चीन ‘इंडस्ट्रिअल ड्रायर्स’च्या नावाखाली पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा पुरवठा करत असल्याचे आढळले होते.
यामुळे चीनमधून ‘दुहेरी-वापर’ लष्करी दर्जाच्या वस्तूंच्या नावाखाली पाकिस्तान भारतीय बंदरामार्गे आण्विक कार्यक्रमांसंबंधित साहित्य मागवीत असल्याचे पुन्हा उघड झाले.
कॉसमॉस इंजिनीअरिंग, ही पाकिस्तानी कंपनी तेव्हापासूनच वॉचलिस्टवर आहे.
नियमांचं उल्लंघन
जप्तीच्या कारवाईमुळे पाकिस्तान क्षेपणास्त्रांच्या बेकायदेशीर व्यापारात आणि मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचे (एमटीसीआर) उल्लंघन करत असल्याची भीती बळकट झाली असल्याचेही या जेएनपीटी बंदरातील एका सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले.