विजय मल्ल्यांच्या 6630 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई
By admin | Published: September 3, 2016 03:17 PM2016-09-03T15:17:47+5:302016-09-03T15:17:47+5:30
बँकांचे हजार कोटींचे कर्ज बु़डवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांची 6630 कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाकडून जप्त करण्यात आली आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - बँकांचे हजार कोटींचे कर्ज बु़डवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांची 6630 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत मल्ल्यांचा मॉल, फार्महाऊस आणि स्टॉक्सचा समावेश आहे. मुंबई आणि बंगळुरुतील संपत्तीवर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केलेल्या महाराष्ट्रातील फार्महाऊसची किंमत 200 कोटींपर्यत आहे. तर बंगळुरुतील मॉलची किंमत 800 कोटींच्या घरात आहे. तसंच युबीएल आणि युएसएलचे शेअर्स 3000 कोटींचे आहेत.
काही दिवसांपुर्वी बँकांचे हजार कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्याविरोधात सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 1600 कोटी कर्जाची परतफेड करण्यात केलेल्या अनियमिततेमुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळाली होती. सीबीआयने याअगोदरही विजय मल्ल्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला होता. मल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी दुस-या पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. रेड कॉर्नर नोटिस जारी केल्याने मल्ल्या यांच्या अडचणी वाढतील आणि त्यांना भारतात आणणंही शक्य होईल. कारण रेड कॉर्नर नोटिस जारी केल्यामुळे मल्ल्या ब्रिटन सोडून इतर कोणत्याही देशात प्रवास करु शकत नाही, आणि जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्यांना अटक होऊ शकते. त्यामुळे ईडीने इंटरपोलला रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन मल्ल्यांनी ब्रिटनबाहेर प्रवास केल्यास विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात येईल.