निवडक पॅसेंजर गाड्या उद्यापासून धावणार,आजपासून तिकीट बुकिंग, पहिली ट्रेन नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलला येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:38 AM2020-05-11T06:38:06+5:302020-05-11T06:38:43+5:30
कोविड-१९ साठी २० हजार डबे राखून ठेवल्यानंतर आणि स्थलांतरितांसाठी दररोज चालविण्यात येणाºया ३०० श्रमिक रेल्वेतील उपलब्ध डब्यांचा विचार करून नव्या मार्गांवर सेवा सुरू होईल.
नवी दिल्ली/मुंबई : रेल्वेची प्रवासी सेवा १२ मेपासून सुरू करण्याची योजना आहे. प्रारंभी, १५ जोड्या रेल्वेंसह (३० परतीचे प्रवास) ती सुरू होईल. या रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावतील व नवी दिल्ली स्थानकातून दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावीला जोडणाऱ्या असतील.
कोविड-१९ साठी २० हजार डबे राखून ठेवल्यानंतर आणि स्थलांतरितांसाठी दररोज चालविण्यात येणाºया ३०० श्रमिक रेल्वेतील उपलब्ध डब्यांचा विचार करून नव्या मार्गांवर सेवा सुरू होईल. प्रवाशांनी मास्क वापरणे व निर्गमनाच्या (डिपार्चर) ठिकाणी स्क्रीनिंग करून घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-१९ ची स्पष्ट लक्षणे नसलेल्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल, असे रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक राजेश दत्त वाजपेयी यांनी निवेदनात म्हटले.
आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकिटे
या रेल्वेंच्या रिझर्व्हेशनसाठी बुकिंग ११ मे रोजी दुपारी ४ वाजेपासून सुरू होईल आणि ते आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरच उपलब्ध असेल.
च्रेल्वे स्थानकांवर तिकीट बुकिंग खिडक्या बंद राहतील आणि प्लॅटफॉर्म्स तिकिटासह कोणतेही तिकीट दिले जाणार नाही. ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकिटे असतील त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.
मजुरांच्या तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून
मुंबई : परराज्यातून महाराष्टÑात येणाºया आणि परराज्यात जाणाºया मजुरांचे रेल्वेभाडे मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मजुरांकडे रेल्वे प्रवासाला लागणारे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल.
दररोज ३०० श्रमिक विशेष गाड्या
स्थलांतरित मजुरांंसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवू द्याव्या, असे आवाहन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व राज्यांना केले असून, दररोज ३०० श्रमिक विशेष ट्रेन्स चालविण्यास रेल्वे गेल्या सहा दिवसांपासून तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहिली ट्रेन नवी दिल्ली-मुंबई सेंट्रलसाठी धावणार आहे. हीच ट्रेन मुंबई सेंट्रलवरून नवी दिल्लीला जाईल. या गाडीच्या वेळेबाबतचे नियोजन केले जात असल्याचे आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी सांगितले.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे विभाग दररोज ३०० विशेष रेल्वेगाड्या चालवू शकते. त्यामुळे पाच दिवसांत जवळपास २० लाख स्थलांतरित मजुरांंना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचविणे शक्य आहे. तथापि, प. बंगाल, राजस्थानसह इतर राज्ये यासाठी मंजुरी देत नाहीत. देशभरात १० मेपर्यंत ३६६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या असून, त्यापैकी २८७ रेल्वेगाड्या इच्छित ठिकाणी पोहोचल्या आहेत, तर ७९ गाड्या मार्गात आहेत.