शुक्रयानाच्या आंतरराष्ट्रीय उपकरणांसाठी २० प्रस्तावांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 01:25 AM2020-11-24T01:25:44+5:302020-11-24T01:26:09+5:30
कोरोनामुळे प्रक्षेपण लांबणार; इस्रोकडून जय्यत तयारी सुरू
बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो)ने आपल्या शुक्रयान मोहिमेसाठी फ्रान्ससह अंतराळ आधारित २० प्रायोगिक प्रस्तावांची निवड केली आहे. बंगळुरूस्थित इस्रो मुख्यालयात सूत्रांनी सांगितले की, यात रशिया, स्वीडन व जर्मनीचे सहयोग योगदानही समाविष्ट आहे.
शुक्र ग्रहावर भारताचे पहिले यान जून २०२३ मध्ये पाठविण्याची इस्रोची योजना होती; परंतु कोरोना महामारीच्या स्थितीमुळे प्रक्षेपणाच्या समयसीमा वाढविण्याचा आढावा घेतला जात आहे. हे यान २०२४ किंवा २०१६ मध्ये प्रक्षेपित केले जाऊ शकते. यान प्रक्षेपित करण्याचा योग्य कालावधी प्रत्येक १९ महिन्यांनी येतो. कारण यावेळी शुक्र ग्रह पृथ्वीच्या सर्वांत जवळ येत असतो.
इस्रोने शुक्राचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ आधारित नवीन प्रस्तावांची घोषणा केली होती. यासाठी भारतीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक उपकरणांचे प्रस्ताव मिळाले आहेत. यातील २० प्रस्तावांची निवड करण्यात आली आहे. इस्रो अधिकाऱ्यांनी सांगितले की, या २० प्रस्तावांमध्ये रशिया, फ्रान्स, स्वीडन व जर्मनीच्या सहयोग योगदानाच्या प्रस्तावांचाही समावेश आहे. याचा आढावा घेतला जात आहे. फ्रान्सची अंतराळ संस्था सीएनईएसने दिलेल्या माहितीनुसार, एका प्रस्तावाची निवड आधीच केली. ते फ्रान्सचे व्हीआयआरएएल उपकरण (व्हीनस इन्फ्रारेड ॲटमस्फेअर गॅस लिंकर) आहे. हे उपकरण रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोस व फ्रान्सच्या राष्ट्रीय वैज्ञािनक संशोधन केंद्र सीएनआरएसशी संबंधित लॅटमोस प्रयोशाळेशी मिळून विकसित करण्यात आले आहे.
पृथ्वीची जुळी बहीण
शुक्राला पृथ्वीची जुळी बहीण म्हटले जाते. कारण दोन्हींचे आकार, घनत्व व गुरुत्वाकर्षण यात समानता आहे. दोन्ही ग्रहांची उत्पत्ती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी एकाच वेळी झाल्याचे मानले जात आहे. पृथ्वीच्या तुलनेत शुक्र ग्रह सूर्याच्या सुमारे ३० टक्के अधिक निकट आहे.