सुभाष चंद्रांची निवड रद्द होणार नाही
By admin | Published: June 14, 2016 04:24 AM2016-06-14T04:24:47+5:302016-06-14T04:24:47+5:30
हरियाणातील राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी घेण्यात आलेल्या द्विवार्षिक निवडणुकीच्या निकालावरून राजकीय पक्षांमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली आहे. मीडियासम्राट सुभाष चंद्रा यांची अपक्ष
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
हरियाणातील राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी घेण्यात आलेल्या द्विवार्षिक निवडणुकीच्या निकालावरून राजकीय पक्षांमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली आहे. मीडियासम्राट सुभाष चंद्रा यांची अपक्ष म्हणून झालेली निवड रद्द करण्यात येणार नसल्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिल्यानंतर, ही लढाई थेट न्यायालयात लढली जाण्याची शक्यता आहे.
तथापि, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्याविरुद्ध कारवाई करण्यावरून काँग्रेस पक्ष संभ्रमावस्थेत सापडला आहे. हुड्डा यांच्या १३ आमदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना वेगवेगळ्या मार्कर पेनचा वापर केल्याचा आरोप आहे. काँग्रेसची ही १३ मते अवैध घोषित करण्यात आल्याकारणाने भाजपाचा पाठिंबा असलेले चंद्रा यांनी राज्यसभा निवडणूक जिंकली आणि आर. के. आनंद यांच्या पदरी पराभव आला.
राज्यसभा निवडणुकीच्या इतिहासात अशा प्रकारची घटना या आधी कधीही घडली नाही. त्यामुळे हरियाणात ही अनोखी राजकीय खेळी खेळणारा कोण असावा, याबाबत निवडणूक विश्लेषकही चकित झाले आहेत. आमदारांवर काय कारवाई करायची, यावरून काँग्रेस पक्ष द्विधा मन:स्थितीत सापडला आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सर्वात ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची पंजाब व हरियाणाचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त केल्यानंतर हुड्डा यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई केली जाण्याची शक्यता नाही. प्रत्यक्ष हुड्डा यांचीच मतपत्रिका कोरी आढळली. त्यामुळे हुड्डा यांच्या आमदारांनी आर. के. आनंद यांना मतदान करण्याचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेले निर्देश धुडकावल्याचे दिसून येते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे निर्देश असे पायदळी तुडविण्यात आल्याचे उदाहरण सापडत नाही.