स्वयंप्रभा डिजिटल योजनेने घरबसल्या दर्जेदार शिक्षण
By admin | Published: July 10, 2017 12:21 AM2017-07-10T00:21:50+5:302017-07-10T00:21:50+5:30
‘स्वयंप्रभा डिजिटल योजनेची’ अनोखी व क्रातिकारी भेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त देशाला दिली.
सुरेश भटेवरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इयत्ता नववी ते पीएच.डीपर्यंतचे दर्जेदार शिक्षण देशातील कोणालाही घरबसल्या उपलब्ध करून देणाऱ्या आणि देशभरातील विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये असलेले सुमारे ७२ लाख ग्रंथांचे ज्ञानभांडार जनतेसाठी खुल्या करणाऱ्या ‘स्वयंप्रभा डिजिटल योजनेची’ अनोखी व क्रातिकारी भेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त देशाला दिली.
‘डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन’ या राष्ट्रीय योजनेत, ‘स्वयं’, ‘स्वयंप्रभा डिजिटल प्लॅटफॉर्म’, ‘नॅशनल डिजिटल लायब्ररी’ आणि नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे. त्यांचे लोकार्पण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी मुखर्जींच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
जगातल्या १00 सर्वश्रेष्ठ शिक्षण संस्थांमधे भारतातल्या शिक्षण संस्थांचे स्थान असावे, शैक्षणिक गुणवत्ता, सुधारणा, संशोधन व पुस्तके एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असावीत, दुर्गम व मागास भागातल्या विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असे स्वप्न राष्ट्रपती मुखर्जींनी पाहिले होते. राष्ट्रपतिपदावरून पायउतार होण्यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी प्रणव मुखर्जींचा शिक्षण क्षेत्राशी संबंधित अखेरचा कार्यक्रम होता. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्याचे निमित्त साधून, राष्ट्रपतींच्या स्वप्नपूर्तीची अपूर्व भेट साऱ्या देशाला दिली.
‘स्वयंप्रभा’ योजना टेलिव्हिजन संचावर, ३२ वाहिन्यांद्वारे आठवड्याचे सातही दिवस २४ तास चालणारी डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा आहे. स्वयं (मॅसिव्ह ओपन आॅनलाइन कोर्स उर्फ ‘मूक’) द्वारे या वाहिन्यांवरून सर्व इयत्ता व अभ्यासक्रमांशी संबंधित विषयांच्या व्हिडीओंचे हिंदी व इंग्रजी भाषेत प्रक्षेपण केले जाईल. इयत्ता नववी ते पीएच.डीपर्यंतच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याची संधी यामुळे साऱ्या देशाला उपलब्ध होणार आहे. हे व्हिडीओ प्रादेशिक भाषांतही उपलब्ध करून देण्यात येतील.
या योजनेद्वारे ७२ लाख पुस्तकांचे ज्ञानभांडार उपलब्ध होईल. याखेरीज देशभरातील विद्यापीठे, आयआयटी, एनआयटीचे शोध निबंध व पुस्तके या योजनेद्वारे उपलब्ध करून दिली जातील. स्पर्धा परीक्षा, तसेच विविध अभ्यासक्रमांचे उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे महागडी पुस्तके खरेदी करावी लागणार नाहीत.
‘नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी’
या योजनेमुळे आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका इत्यादींचे एकदा सत्यापन केल्यानंतर, विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश, नोकरी इत्यादीसाठी हे दस्तऐवज वारंवार घेउन हिंडण्याची गरज पडणार नाही. साऱ्या गोष्टी या योजनेद्वारे या आॅनलाइन उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांच्या वैधता तपासता येईल. बनावट पदव्या व मार्कशीटसचा धोका त्यामुळे आपोआप संपुष्टात येणार आहे.
>भारताचे उच्चशिक्षण आज नव्या पर्वात प्रवेश करीत आहे. व्यक्तिगत जीवन आणि आध्यात्म यात गुरुपौर्णिमेच्या दिनाचे विशेष महत्त्व आहे. या शुभदिनंी विविध शिक्षणक्रमांचे घरबसल्या आॅनलाइन शिक्षण मिळण्याची अलौकिक सोय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उपलब्ध करून दिली, ही देशाच्या इतिहासातली अलौकिक घटना आहे.-प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती