रेल्वेच्या धडकेत गायीचा मृत्यू; स्वयंघोषित गोरक्षकाची लोको पायलटला वारंवार मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 13:12 IST2019-07-09T13:02:40+5:302019-07-09T13:12:35+5:30
कथित गोरक्षकाची लोको पायलटला शिवीगाळ, मारहाण

रेल्वेच्या धडकेत गायीचा मृत्यू; स्वयंघोषित गोरक्षकाची लोको पायलटला वारंवार मारहाण
अहमदाबाद: स्वयंघोषित गोरक्षकाचा फटका लोको पायलटला बसला आहे. ट्रेन वेगात असताना अचानक समोर आलेल्या गायीचा मृत्यू झाल्यानं कथित गोरक्षकानं लोको पायलटला अनेकदा मारहाण केली. पाटणमधील सिधपूर जंक्शनजवळ हा प्रकार घडला.
लोको पायलट जी. ए. झाला शनिवारी ग्वालियार-अहमदाबाद सुपरफास्टवर सेवा बजावत होते. त्यावेळी सिधपूर जंक्शनजवळ एक गाय अचानक रुळांवर आली. यावेळी स्टेशन मास्तरांनी लाल निशाण फडकावलं. मात्र झाला यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि गाय रेल्वेखाली आली. यानंतर झाला यांनी गायीचं मृत शरीर उचलण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी बिपीनसिंह राजपूत नावाच्या २८ वर्षीय प्रवाशानं झाला यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
स्वत:ला गोरक्षक म्हणवणाऱ्या राजपूत यांनी लोको पायलट झाला यांच्यावर हल्ला केल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. यानंतर १५० गोरक्षकांचा जमाव घटनास्थळी आला आणि त्यांनी झाला यांना धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर थोड्या वेळानं ट्रेन सुरू झाली आणि राजपूत यांनी दोनवेळा झाला यांच्यावर हल्ला केला. पोलिसांची मदत घेण्यासाठी झाला मेहसाणात उतरले. त्यावेळी राजपूत यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी राजपूतला ताब्यात घेतलं.