सेल्फीने घेतला जीव, नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 03:45 PM2017-10-27T15:45:26+5:302017-10-27T15:46:02+5:30
सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणी आंध्रप्रदेशच्या राहणा-या होत्या.
कोरापूट (ओडिशा) - सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणी आंध्रप्रदेशच्या राहणा-या होत्या. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. एका तरुणीचं नाव ज्योती (27) असून ती विशाखापट्टणमची राहणारी होती, तर दुसरी तरुणी श्रीदेवी (23) विजयनगरची रहिवासी होती.
दोन्ही तरुणी विशाखापट्टणम येथून पर्यटनासाठी आल्या होत्या. एकूण नऊ जणी पर्यटनासाठी आल्या होत्या. नागाबली येथील पुलावर या सर्वजणी फिरत होत्यात त्यानंतर काहीजणी फोटो काढण्यासाठी खाली नदीत उतरल्या. नदीतील एका दगडावर उभं राहून फोटो काढत असताना तोल गेल्याने ज्योती आणि श्रीदेवी पाण्यात पडल्या आणि वाहून गेल्या. बचाव पथक आणि स्थानिकांच्या मदतीने दोन्ही तरुणींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं आहे.
रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू, सेल्फी काढण्याच्या नादात गमावला जीव ?
रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बंगळुरुमधील बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी ही शक्यता वर्तवली असून, अपघात झाला तेव्हा तरुण नेमके ट्रेनपासून किती अंतरावर होते याचा अंदाज लावला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला. दोन तरुणांची ओळख पटली आहे. बंगळुरुमधील नॅशनल कॉलेजमध्ये ते शिकत होते. काही वेळापुर्वी तिघे मित्र बंगळुरुजवळील अॅम्यूजमेंट पार्कात गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन आठवड्यांमध्ये सेल्फीमुळे मृत्यू होणारी बंगळुरुमधील ही दुसरी घटना होती.
मित्र बुडत असताना बाकीचे बाजूला उभे राहून काढत होते सेल्फी
बंगळुरुत एक 17 वर्षीय तरुण सेल्फीचा बळी ठरला होता. जेव्हा तरुण तलावात बुडत होता तेव्हा तिथेच तलावात मजा मस्ती करणारे मित्र मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते. सेल्फी काढण्याकडे लक्ष नसतं तर कदाचित आपला मित्र बुडत असल्याचं त्यांना कळलं असतं, आणि जीव वाचवला असता. 17 वर्षीय तरुण नॅशनल कॉलेजचा विद्यार्थी होता. बंगळुरुपासून 40 किमी अंतरावर असणा-या रामनगर जिल्ह्यातील कनकपूरा येथे ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचं नाव विश्वास असून दक्षिण बंगळुरुमधील हनुमंता नगर येथे तो राहायचा. त्याचे वडील गोविंदराजू ऑटोरिक्षा चालक असून त्याची आई सुनंगा गृहिणी आहे.