'सेल्फी विथ कोब्रा' पडला २५ हजारला
By admin | Published: August 11, 2016 12:35 PM2016-08-11T12:35:09+5:302016-08-11T12:45:33+5:30
आकर्षक सेल्फीच्या नादात अनेक जण प्राण्यांनाही सोडत नाहीत. प्राण्यांसोबत सेल्फी घेताना आपण वन्यजीव नियमांचे उल्लंघन करत आहोत हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
वडोदरा, दि. ११ - आकर्षक सेल्फीच्या नादात अनेक जण प्राण्यांनाही सोडत नाहीत. प्राण्यांसोबत सेल्फी घेताना आपण वन्यजीव नियमांचे उल्लंघन करत आहोत हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. वडोद-यामध्ये अशाच 'सेल्फी विथ कोब्रा'साठी एका बांधकाम व्यावसायिकाला २५ हजार रुपये दंड भरावा लागला.
आरोपी यशेष बारोत यांनी सापा सोबतचा सेल्फी काढून फेसबुकवर पोस्ट केला. 'कोब्रा फॉर १०००' असे कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिले. हा सेल्फी इतका महाग पडेल अशी कल्पनाही त्यावेळी यशेष बारोत यांनी केली नसेल. एफबीवरच्या त्या फोटोला १ लाख लाईक्स मिळाले. व्हॉटस अॅपवरुन तो फोटो व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव कार्यकर्त्यांचे लक्ष गेले.
वन्यजीव कार्यकर्त्यांनी या फोटोची माहिती वन खात्याला दिली. मला माझ्या मित्राने व्हॉटस अॅपवरुन हा फोटो पाठवला. मी लगेच हा फोटो वन्यजीव कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर शेअर केला. आम्ही जिल्हा वन अधिका-यांना या फोटोची माहिती दिली. त्यांनी आरोपी यशेष बारोतला ताब्यात घेऊन दंड ठोठावला असे प्राणीमित्र कार्यकर्त्या नेहा पटेल यांनी सांगितले.
आम्ही आरोपीला बोलावून घेतले. त्याने सापा सोबत सेल्फी घेतल्याचे कबूल केल्यानंतर आम्ही २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी नंतर हा फोटो काढून टाकला. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कोब्रा सापच्या विक्रीवर बंदी आहे असे वडोदरा रेंजचे वन अधिकारी पी.बी.चौहान यांनी सांगितले.