सेल्फी विथ एक्झाम पडली महागात! 12 वी परीक्षा द्यायला दोन वर्षांची बंदी
By admin | Published: May 23, 2017 12:39 PM2017-05-23T12:39:23+5:302017-05-23T12:39:23+5:30
स्मार्टफोन्समध्ये सेल्फी कॅमे-याची सोय झाल्यापासून अनेकांना सेल्फी काढण्याची सवय जडली आहे. सेल्फी कुठे काढावा याला सुद्धा काही ताळतंत्र असले पाहिजे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 23 - स्मार्टफोन्समध्ये सेल्फी कॅमे-याची सोय झाल्यापासून अनेकांना सेल्फी काढण्याची सवय जडली आहे. सेल्फी कुठे काढावा याला सुद्धा काही ताळतंत्र असले पाहिजे. पिकनिक, हॉटेल किंवा कट्टयावर मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सेल्फी काढणे चुकीचे नाही. पण कोणी परीक्षा केंद्रावर सेल्फी काढत असेल तर?
गुजरातच्या पोरबंदरमध्ये परिक्षा हॉलमध्ये सेल्फी काढण्याची हौस एका बारावीच्या विद्यार्थ्याला चांगलीच महाग पडली. वत्सल करामता (17) या विद्यार्थ्याने परिक्षा हॉलमध्ये सेल्फी काढला म्हणून गुजरात बोर्डाने त्याला बारीवाची परीक्षा देण्यावर दोनवर्षांची बंदी घातली आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वी वत्सलने त्याच्या पँटच्या खिशातून मोबाईल काढला आणि त्यावर काही सेल्फी फोटो काढले.
वत्सलची ही कृती परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाली. ही घटना मार्च महिन्यात होती. पण अलीकडे परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना हा प्रकार गुजरात बोर्डाच्या अधिका-यांच्या लक्षात आला. 2014 पासून गुजरात बोर्ड नियमितपणे परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करते.
वत्सलने कॉपी किंवा अन्य फसवणुकीसाठी मोबाईलचा वापर केला नाही पण त्याने नियम मोडल्याचे कबुल केले. बोर्डाने त्याच्यावर मार्च 2019 पर्यंत परीक्षा देण्यावर बंदी घातली आहे. गुजरात बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली.