बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो पाठवा आणि पैसे मिळवा, नितीन गडकरींची आयडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 02:37 PM2017-11-21T14:37:23+5:302017-11-21T14:39:53+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणा-या गाड्यांचे फोटो काढून प्रशासनाला पाठवण्याचं आवाहन केलं आहे. गाड्यांचे फोटो पाठवणा-यांना बक्षिसही दिलं जाईल असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणा-या गाड्यांचे फोटो काढून प्रशासनाला पाठवण्याचं आवाहन केलं आहे. गाड्यांचे फोटो पाठवणा-यांना बक्षिसही दिलं जाईल असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. वाहनचालकाला जो 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, त्यातील 10 टक्के रक्कम माहिती पुरवणा-या व्यक्तीला देण्यात येणार आहे. 'आपल्या मंत्रालयाबाहेर नसलेल्या पार्किंग लॉटमुळे अॅम्बेसिडर गाड्या आणि प्रतिष्ठित लोकांना संसदेच्या मार्गावरच पार्किंग करावं लागतं, ज्यामुळे संसदेकडे येणा-या रस्त्यावर कोंडी होते. हे फारच लाजिरवाणं असल्याचं', नितीन गडकरी यावेळी बोलले आहेत.
'मोटर वाहन कायद्यात मी एक तरतूद करणार आहे. रस्त्यावर असलेल्या कारचे फोटो तुमच्या मोबाइल फोनवर घ्या आणि संबंधित विभागाला किंवा पोलिसांना पाठवा असं आवाहन त्यातून करणार आहे. बेकायदेशीर पार्किंगसाठी 500 रुपयांचा दंड असून, त्यातील 10 टक्के रक्कम गाडीची माहिती पाठवणा-याला देण्यात येईल', असं नितीन गडकरी बोलले आहेत. 'पार्किंगला जागाच शिल्लक नसल्याने लोक त्यासाठी रस्त्यांचा वापर करत आहेत. किमान मोठ्या संस्थांमध्ये तरी पार्किंगची सुविधा असली पाहिजे', असं गडकरींनी सांगितलं.
'प्रत्येक दिवस माझ्यासाठी लाजिरवाणा असतो. अॅम्बेसिडर गाड्या येत असतात....मोठे लोक येत असतात. संसदेसमोर संपुर्ण रस्ता ब्लॉक होतो. आणि पार्किंगची जागा बांधण्यासाठी मला 13 परवानग्यांची गरज होती. फक्त सिंगल पार्किंग लॉट बांधण्याची परवानगी मिळण्यासाठी मला अनेक महिने लागले. मी हा मुद्दा शहरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांच्याकडे उपस्थित केला आहे', अशी माहिती गडकरींनी दिली.
आपल्या मंत्रालयाच्या ऑटोमेट पार्किंगच्या भूमीपुजनादरम्यान गडकरी बोलले की, 'माझ्या मंत्रालयाला फक्त एका सिंग ऑटोमेटेड पार्किंग लॉटसाठी नऊ महिने वाट पाहावं लागणं लाजिरवाणं होतं. माझा त्यावेळी प्रचंड संताप झाला होता'. ऑटोमेटेड मल्टिलेव्हल पार्किंग सुविधा असणारी ट्रान्सपोर्ट भवन ही पहिली सरकारी इमारत असणार आहे. यासाठी एकूण नऊ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.