आर. वेंकटरामानी होणार देशाचे नवे अॅटर्नी जनरल, केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 11:02 PM2022-09-28T23:02:22+5:302022-09-28T23:08:28+5:30
R Venkataramani : अॅटर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आणि केंद्र सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात.
नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आर. वेंकटरामानी (R Venkataramani) यांची भारताचे नवे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पदावर तीन वर्षे राहतील.
सध्याचे अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यांची जागी आता आर वेंकटरामानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केके वेणुगोपाल (91 वर्षे) यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार होता. मात्र, केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याकडे अॅटर्नी जनरल पदाची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही.
दरम्यान, कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाने ट्विट करून आर. वेंकटरामानी यांच्या नियुक्तीची पुष्टी केली. किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाच्यावतीने आर. वेंकटरामानी यांना 1 ऑक्टोबर 2022 पासून भारताचे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे.
माननीय राष्ट्रपति, श्री आर. वेंकटरमणी, वरिष्ठ अधिवक्ता को दिनांक 1 अक्टूबर, 2022 से भारत के महान्यायवादी के पद पर नियुक्त करती हैं।
— Office of Kiren Rijiju (@RijijuOffice) September 28, 2022
Honorable President is pleased to appoint Shri R. Venkataramani, Senior Advocate as Attorney General for India w.e.f. 1st October 2022. pic.twitter.com/MnChp8TRGv
दरम्यान, अॅटर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आणि केंद्र सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात. ते सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करतात. काहीवेळा राष्ट्रपती कोणत्याही कायदेशीर किंवा घटनात्मक मुद्द्यावर अॅटर्नी जनरलचा सल्ला घेतात.
आर. वेंकटरामानी यांच्याविषयी...
13 एप्रिल 1950 रोजी पाँडिचेरी (आता पुडुचेरी) येथे जन्मलेले आर. वेंकटरामाणी हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताच्या कायदा आयोगाचे सदस्य आहेत. तीन दशकांहून अधिक काळ ते सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे, विद्यापीठे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रतिनिधित्व केले आहे.
आर. वेंकटरामानी यांनी जुलै 1977 मध्ये बार कौन्सिल ऑफ तामिळनाडूमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, 1979 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 1997 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामांकित केले. 2010 मध्ये त्यांची विधी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2013 मध्ये त्यांना कायदा आयोगाचे सदस्य म्हणून आणखी एक टर्म मिळाली होती.