भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 11:23 PM2024-07-03T23:23:36+5:302024-07-03T23:24:42+5:30
Lal Krishna Advani: यापूर्वी 27 जून रोजीही लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बुधवारी (३ जुलै) पुन्हा एकदा खालावली. त्यांना तातडीने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, येथे डॉ. विनीत पुरी हे अडवाणींवर उपचार करत आहेत. तसेच, अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याचेही पुरी यांनी म्हटले आहे.
याशिवाय, लालकृष्ण अडवाणी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी 27 जून रोजीही लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या आठवड्यातही खालावली होती प्रकृती -
देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी (९६) यांना बुधवारी (26 जून) सायंकाळी उशिरा अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. युरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, लालकृष्ण अडवाणी यांचे एक छोटे ऑपरेशन करण्यात आले. आता त्यांना बरे वाटत आहे. यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आडवाणी यांना दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला होता.