डोळ्यांतून अश्रू तरळले, भारतरत्न मिळाल्यावर लालकृष्ण अडवाणी झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 04:02 PM2024-02-03T16:02:08+5:302024-02-03T16:05:57+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला.
Bharat Ratna To LK Advani ( Marathi News ): भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली. भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणींच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची कन्या प्रतिभा अडवाणी ही अडवाणींसोबत त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आहे. यावेळी त्यांनी वडिलांचे अभिनंदन केले. दरम्यान, लालकृष्ण अडवाणींनी हात जोडून अभिवादन केले.
लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न; मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राम मंदिर आंदोलन...”
यावेळी प्रतिभा अडवाणी म्हणाल्या की, लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाल्याने संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. आज मला माझ्या आईची सर्वात जास्त आठवण येते कारण वडीलांच्या आयुष्यात त्यांचे योगदान मोठे आहे, मग ते वैयक्तिक असो वा राजकीय जीवन. जेव्हा मी पुरस्काराबाबत त्यांना सांगितले तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि म्हणाले की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या देशाची सेवा करण्यात घालवले. प्रतिभा अडवाणी म्हणाल्या, "इतका मोठा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि देशातील जनतेचे आभार मानले.
"ते खूप भारावून गेले आहेत. ते कमी बोलतात. पण त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. राम मंदिराच्या अभिषेकवेळीही ते खूप आनंदी होते. हे त्यांच्या आयुष्यातील एक स्वप्न होते ज्यासाठी त्यांनी पाहिले होते. खूप दिवस झगडले आणि काम केले. त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की जेव्हा कोणी त्यांची स्तुती करतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, असंही प्रतिभा अडवाणी म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार दिल्याबाबत सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कुटुंबासाठी, देशासाठी आणि आम्हा सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. राम मंदिरासाठी १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा झाली. तेव्हापासून अनेक कायदेशीर बाबी आल्या. अनेक गोष्टी घडल्या. मात्र, आजच्या घडीला प्रत्यक्षात राम मंदिर सर्वांसमोर उभे राहिले आहे. राम मंदिराचे आंदोलन हे लालकृष्ण अडवाणी यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता. राम मंदिराचे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजले. खूप संघर्ष झाला. आंदोलन यशस्वी होऊन राम मंदिर बनल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, अशी प्रतिक्रिया जयंत अडवाणी यांनी दिली.
दरम्यान, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन केले.
#WATCH | Delhi | Government of India announces Bharat Ratna for veteran BJP leader Lal Krishna Advani.
— ANI (@ANI) February 3, 2024
Visuals from his residence as he greets the people and media here. pic.twitter.com/C0NLemHsZ2