भाजपातील लोक सर्वात जास्त भयभीत, यशवंत सिन्हा यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 11:02 AM2018-01-31T11:02:16+5:302018-01-31T11:03:22+5:30
आज देशातील परिस्थिती ७० वर्षांपूर्वी गांधीजींच्या हत्येच्या वेळी होती तितकीच भीषण आहे व लोकशाही संस्था धोक्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करून देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर राजकारण बाजूला ठेवून विचारमंथन करण्यासाठी भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी ‘राष्ट्रमंच’ या व्यासपीठाची औपचारिक स्थापना केली. यावेळी यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. आज देशातील परिस्थिती ७० वर्षांपूर्वी गांधीजींच्या हत्येच्या वेळी होती तितकीच भीषण आहे व लोकशाही संस्था धोक्यात आल्या आहेत, असा आरोप करून यशवंत सिन्हा यांना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘भाजपामध्ये आज सर्वजण भयभीत आहेत, पण आम्ही त्या भयाला जुमानत नाही’, असंही ते म्हणाले.
देशात संवाद आणि चर्चा, असभ्य, एकाबाजूची आणि भयानक झाली आहे. गर्दीचं काम प्रकरणांना न्याय देण्याचं झालं आहे, असं दिसायला लागलं आहे, असंही यशवंत सिन्हा यांनी म्हंटलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना लावून धरणं, हे माझ्या संघटनेचा मुख्य हेतू असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी तयार केलेली संघटना कुठल्याही पक्षाच्या विरोधात नसेल तर ती राष्ट्रीय मुद्यांवर जोर देण्याची कारवाई करेल, असा दावाही यशवंत सिन्हा यांनी केला.
दरम्यान, भाजपाचे आणखी एक नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याखेरीज दिनेश त्रिवेदी (तृणमूल काँग्रेस), रेणुका चौधरी (काँग्रेस), माजीद मेमन (राष्ट्रवादी) व संजय सिंग (आम आदमी) या खासदारांसह सोमपाल व हरमोहन धवन हे माजी केंद्रीय मंत्री, गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता आणि लोकदलाचे जयंत चौधरी हे या मंचात सहभागी झाले होते. पक्षात मोकळेपणाने मतं मांडता येत नाहीत, म्हणून आपण या मंचावर आलो. पण असं करणं पक्षविरोधी नाही, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हंटलं.