ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांचं निधन
By Admin | Published: January 2, 2016 09:16 PM2016-01-02T21:16:57+5:302016-01-03T00:10:53+5:30
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस ए. बी. वर्धन यांचं शनिवारी निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते अर्धेन्दू भूषण उपाख्य भाई बर्धन यांचे शनिवारी रात्री येथील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देश एका अभ्यासू आणि कुशल तत्वनिष्ठ राजकीय नेत्यास मुकला आहे.
92 वर्षीय बर्धन यांना गेल्या महिन्यात पक्षाघातानंतर उपचारार्थ येथील जी.बी. पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली. काल त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते आणि त्यांचा श्वासोच्छवासही सामान्य होता. परंतु अचानक त्यांचा रक्तदाब कमी झाला. रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला,अशी माहिती पंत हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी विभागाचे संचालक आणि प्रोफेसर डॉ. विनोद पुरी यांनी दिली. तत्पूर्वी सायंकाळी बर्धन अत्यवस्थ असल्याचे भाकपाचे राष्ट्रीय सचिव डी.राजा यांनी सांगितले होते.
ए.बी. बर्धन हे कामगार संघटनेचे आंदोलन आणि महाराष्ट्रातील डाव्या राजकारणाचा एक प्रमुख चेहरा राहिलेआहेत. 1957 साली अपक्ष उमेदवार म्हणून ते राज्य विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर त्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) महासचिवपदाची जबाबदारी सांभाळली. आयटक ही भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना आहे.
बर्धन 1990 च्या दशकात दिल्लीत आले आणि भाकपाचे उपमहासचिव झाले. पुढे 1996 साली इंद्रजित गुप्ता यांच्या जागी पक्षाचे महासचिव झाले.
कॉम्रेड बर्धन यांचा जन्म 1924 साली आताच्या बांगलादेशमधील सिलहट येथे झाला. परंतु नागपूरला त्यांनी आपली कर्मभूमी बनविले होते. राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणारा अत्यंत प्रामाणिक, सचोटीचा, निष्कलंक नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.