कुणासाठी मोडला ३८ वर्षांचा संसार? ६५ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार प्रसिद्ध वकील हरीश साळवे!
By Ravalnath.patil | Published: October 25, 2020 06:48 PM2020-10-25T18:48:14+5:302020-10-26T11:35:13+5:30
Harish Salve : हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच आपल्या कौशल्यामुळे प्रख्यात वकील आहेत. यामुळेच त्यांना भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले होते.
नवी दिल्ली : माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे पुढील आठवड्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. हरीश साळवे हे देशातील नामांकित वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. ६५ वर्षीय हरीश साळवे यांनी गेल्या महिन्यात आपली पहिली पत्नी मीनाक्षी साळवे यांच्यापासून घटस्फोट घेतला. हरीश साळवे आणि मीनाक्षी साळवे जवळपास ३८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर विभक्त झाले. हरीश साळवे आणि मीनाक्षी साळवे यांना दोन मुलीही आहेत.
आता हरीश साळवे येत्या २७ ऑक्टोबरला लंडनच्या चर्चमध्ये मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसर्ज यांच्याशी लग्न करणार आहेत. हरीश साळवे आणि कॅरोलिन या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. ५६ वर्षीय कॅरोलिन या कलाकार असून त्यांना एक मुलगी आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे यांची कॅरोलिन यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. आता दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच आपल्या कौशल्यामुळे प्रख्यात वकील आहेत. यामुळेच त्यांना भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले होते. २०१९ साली आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची बाजू हरीश साळवे यांनीच मांडली होती. या प्रकरणात पाकिस्तानला त्यांनी तोंडावर पाडले होते. परंतु उल्लेखनीय म्हणजे, या केससाठी त्यांनी नाममात्र एक रुपया फी म्हणून घेतली होती. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी केवळ एक दिवस अगोदर हरीश साळवे यांना फोन करून आपली फी घेऊन जाण्याची विनंती केली होती.
दरम्यान, सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे आणि हरीश साळवे यांचे एकाच शाळेत शिक्षण झाले आहे. दोघांनी महाराष्ट्रातील नागपूरात शिक्षण घेतले. १९७६ मध्ये हरीश साळवे दिल्लीला आले आणि शरद बोबडे हे मुंबई उच्च न्यायालयात आले. यानंतर शरद बोबडे हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आणि हरीश साळवे हे वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सॉलिसिटर जनरल बनले.