'चमचे चोर' पत्रकार! ममता बॅनर्जींसोबत गेलेल्या पत्रकारांनी चोरले चमचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 07:21 PM2018-01-10T19:21:10+5:302018-01-10T19:30:27+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत लंडन दौऱ्यावर गेलेल्या काही ज्येष्ठ पत्रकारांनी अत्यंत लाजिरवाणं कृत्य केलं आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत लंडन दौऱ्यावर गेलेल्या काही ज्येष्ठ पत्रकारांनी अत्यंत लाजिरवाणं कृत्य केलं आहे. या पत्रकारांनी हॉटेलमधले चांदीचे चमचे चोरल्याची घटना समोर आली आहे. डायनिंग हॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही चोरी कैद झाली आहे. ‘आऊटलुक’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
ममता बॅनर्जींच्या लंडन दौ-यादरम्यान ज्येष्ठ पत्रकारांचा एक चमू त्यांच्यासोबत होता. लंडनमधल्या अलिशान हॉटेलमध्ये सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेलमध्ये रात्री भोजनाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका ज्येष्ठ संपादकानं मेजवरचे चांदीचे चमचे आपल्या बॅगेत भरले. या पत्रकारांनी चमचे चोरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले होते.
हॉटेलकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे समजताच इतर पत्रकारांनी चोरी केलेले चमचे कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले. चमचा चोरून देखील एक पत्रकार बराच वेळ सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालत होता. चोरी करताना पकडण्यात आलेले हे ज्येष्ठ संपादक पश्चिम बंगालमधल्या एका प्रसिद्ध लेखकाचे पुत्र असल्याचं समजतं. सीसीटीव्हीमधील पुरावे दाखवून नंतरच या संपादकांवर कारवाई करण्यात आल्याचं आऊटलुकनं म्हटलं आहे.