Sharad Yadav: ज्येष्ठ नेते आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 11:42 PM2023-01-12T23:42:50+5:302023-01-12T23:47:10+5:30
Sharad Yadav: भारताच्या राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज नेते आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं आज निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते.
नवी दिल्ली - भारताच्या राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज नेते आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं आज निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यांनी त्यांच्या निधमाची माहिती दिली आहे.
समाजवादी राजकारणामुळे शरद यादव यांनी बिहारमध्ये लोकप्रियता मिळवली होती. तसेच अल्पावधीतच त्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये आपले वेगळे स्थान मिळवले होते. त्यांनी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तसेच भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे निमंत्रक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती.
पूर्व केंद्रीय मंत्री शरद यादव का निधन हुआ, उनकी बेटी ने फेसबुक पोस्ट के जरिए इसकी पुष्टि की। pic.twitter.com/4NZFoL27uC
— ANI_HindiNews (@AHindinews) January 12, 2023
शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती ट्विट करून दिली. त्यांनी लिहिले की, बाबा आता या जगामध्ये राहिले नाहीत. शरद यादव यांनी बिहार आणि राष्ट्रीय राजकारणामधील अनेक स्थित्यंतरे पाहिली होती. जेपी आंदोलनामधून पुढे आलेल्या नेत्यांपैकी ते एक नेते होते. त्यांनी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचा कार्यकाळ पाहिला होता. तसेच तिथे सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नितीश कुमार यांचं सरकार पाहिलं होतं. तसेच नंतर भाजपाविरोधात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचेही ते साक्षीदार होते. दरम्यान, वाजपेयींच्या नेतृत्वात एनडीए केंद्रात सत्तेत असताना महत्त्वाच्या नेत्यांपैकी शरद यादव हे एक होते. कारकीर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
शरद यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात पंतप्रधान मोदींनी शरद यादव यांची राजकीय कारकीर्द आणि जीवनप्रवासाला अभिवादन केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पूर्व केंद्रीय मंत्री शरद यादव के निधन पर शोक व्यक्त किया। pic.twitter.com/fsKzCVeFJv
— ANI_HindiNews (@AHindinews) January 12, 2023