वाढत्या असहिष्णूतेविरोधात ज्येष्ठ वैज्ञानिक भार्गव 'पद्म' पुरस्कार परत करणार
By admin | Published: October 29, 2015 11:57 AM2015-10-29T11:57:57+5:302015-10-29T11:59:44+5:30
देशातील वाढत्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव 'पद्मविभूषण' पुरस्कार सरकारला परत करणार.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २९ - गेल्या काही दिवसांपासून देशातील वाढत्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ अनेक लेखक व कलावंत पुरसक्रा परत करत असताना आता त्यात शास्त्रज्ञही सहभागी झाले असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव त्यांचा 'पद्मविभूषण' पुरस्कार सरकारला परत करणार आहेत. भारतातील पेशीय व आण्विक जीवशास्त्र केंद्राचे ( सीसीएमबी) संस्थापक असलेल्या भार्गव यांनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर केला.
सरकार आणि संघ आमच्यावर आम्ही काय खावे, काय करावे याबद्दल दबाव टाकत आहे, मात्र त्यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर गदा येत असून ते मला बिलकूल पसंत नाही, असे भार्गव म्हणाले. सरकार देशामध्ये जातीय आणि धर्माच्या आधारावर फूट पाडणाऱ्या गटांना मोकळीक देत आहे, असा आरोप भार्गव यांनी केला आहे. एखादा कलाकार त्याच्या कलेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करू शकतो. पण मी वैज्ञानिक आहे, मग मी माझा निषेध कसा व्यक्त करायचा?, म्हणूनच मी मला मिळालेला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भार्गव यांनी सांगितले.
दरम्यान एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी तो तिढा न सुटल्यामुले १२ दिग्दर्शकांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. १३९ दिवसांच्या आंदोलनानंनतर एफटीआयआयचा न सुटलेला तिढा व देशातील वाढत्या असहिष्णुतेचे कारण देत या दिग्दर्शकांना आपापले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यामध्ये दिबाकर बॅनर्जी, आनंद पटवर्धन, परेश कामदार, निशिता जैन, किर्ती नाखवा, हर्षवर्धन कुलकर्णी, हरी नायर, राकेश शर्मा, इंद्रनील लहरी आणि लिपिका सिंग दराई यांचा समावेश आहे.