"मी सगळ्या फाईल्स फेकून देईन"; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा वकिलांवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:54 IST2025-02-28T17:54:24+5:302025-02-28T17:54:24+5:30

सुप्रीम कोर्टात एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अभय ओका यांनी वकिलांवर संताप व्यक्त केला.

Senior Supreme Court judge Justice Abhay S Oka got angry during the hearing in the court room | "मी सगळ्या फाईल्स फेकून देईन"; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा वकिलांवर संताप

"मी सगळ्या फाईल्स फेकून देईन"; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा वकिलांवर संताप

Supreme Court: सुप्रीम कोर्टात एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अभय ओका चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. वकिलांनी सुनावणीदरम्यान केलेल्या वर्तणुकीमुळे न्यायमूर्ती अभय ओका यांनी संताप व्यक्त केला. कोर्टरुममध्ये एकाच वेळी अनेक वकिलांनी आपापले युक्तिवाद मांडण्यास सुरुवात केली. हे पाहून न्यायमूर्ती ओका यांनी वकिलांना शांत राहून एक एक करुन युक्तीवाद करण्यास सांगितले. मात्र वकिलांनी न्यायमूर्तींचेही ऐकले नाही आणि गोंधळ घालणं चालूच ठेवलं. हे पाहून न्यायमूर्ती ओका वकिलांवर संतापले आणि त्यांनी हा सगळा पाहून कंटाळा आल्याचे म्हटलं.

न्यायमूर्ती अभय एस ओका यांनी असा शिस्तीचा अभाव पाहून मी कंटाळलो आहे, असं म्हटलं. न्यायालयात दररोज शिस्तीचा अभाव दिसून येत आहे. आम्ही वकिलांना विचारत राहतो की ते कोणासाठी हजर आहेत, पण वकील काहीच उत्तर देत नाहीत, अशा शब्दात न्यायमूर्ती अभय एस ओका यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही या प्रकारावर भाष्य केलं. "या गोंधळात अनेक हस्तक्षेप करणारे लोक आहेत, जे केस कोर्टाबाहेर फेकण्याचा प्रयत्न करत आहेत.  खटला बंद करणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे. त्यामुळे ज्यांची प्रकरणे यादीत आहेत त्यांना न्यायालयात युक्तिवाद करता येत नाहीत आणि जे लोक कामात सहभागी नाहीत ते हस्तक्षेप करत असतात," कपिल सिब्बल म्हणाले.


"कोर्टात असेच वातावरण राहिले तर मी सर्व फाईल्स फेकून देईन. आता असा नियम लागू केला पाहिजे की वकिलांनी एकाच वेळी सतत युक्तिवाद करत राहिल्यास त्यांच्या फायली फेकल्या जातील. अशा प्रकारचा शिस्तीचा भंग केवळ सर्वोच्च न्यायालयातच पाहायला मिळतोय. मी कर्नाटक आणि मुंबई उच्च न्यायालयातही काम केले आहे, पण मी तिथे असे कधीच पाहिले नाही,” असंही न्यायमूर्ती अभय एस ओका यांनी म्हटलं.

न्यायमूर्ती एस ओका वकिलांवर संतापल्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. याआधीही अनेक प्रकरणांमध्ये वकिलांकडून खोटी माहिती मिळत असल्याबद्दल न्यायमूर्ती एस ओका यांना नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये न्यायमूर्ती एस ओका आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने म्हटलं होतं की अशी अनेक प्रकरणे आमच्यासमोर आली आहेत ज्यात खोटे युक्तिवाद करण्यात आले आहेत.
 

Web Title: Senior Supreme Court judge Justice Abhay S Oka got angry during the hearing in the court room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.