सेनोरिटा ओबामा
By admin | Published: January 27, 2015 11:37 PM2015-01-27T23:37:38+5:302015-01-27T23:37:38+5:30
सेनोरिटा, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है... हे वाक्य त्यांनी उच्चारताच प्रचंड टाळ्या व शिट्ट्यांच्या कडकडाटाने दिल्लीतील सिरीफोर्ट सभागृह मंगळवारी आपादमस्तक दणाणून गेले
नवी दिल्ली : सेनोरिटा, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है... हे वाक्य त्यांनी उच्चारताच प्रचंड टाळ्या व शिट्ट्यांच्या कडकडाटाने दिल्लीतील सिरीफोर्ट सभागृह मंगळवारी आपादमस्तक दणाणून गेले. कारण हे वाक्य उच्चारणारी व्यक्ती शाहरूख खान नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे होते.
भारत दौऱ्यातले आपले अखेरचे सार्वजनिक भाषण त्यांनी येथील टाऊन हॉलमध्ये दिले. आपल्या भाषणाच्या प्रारंभी त्यांनी उपस्थितांना नमस्ते म्हणून अभिवादन केले तर अखेरीस जयहिंद म्हणून त्याचा समारोप केला. या भाषणात त्यांनी बहुत धन्यवाद, दिवाळी, भांगडा, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मिल्खासिंग, मेरी कोम, कैलाश सत्यार्थी यांच्याविषयी सर्वांनाच अभिमान वाटतो असे म्हटले.
१८९३ मध्ये अमेरिकेच्या शिकागो मध्ये स्वामी विवेकानंद यांनी, माय सिस्टर्स अॅन्ड ब्रदर्स या आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उच्चारलेल्या शब्दांचे स्मरण करून आपण आजही भारतात भाषण करताना, माय सिस्टर्स अॅन्ड ब्रदर्स आॅफ इंडिया अशीच सुरुवात करत असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.
आपल्या भाषणादरम्यान त्यांनी, मागच्या भेटीत मुंबईत मुलांसोबत नृत्य केल्याची आठवण करताना या खेपेला तसे नृत्य करणे जमले नाही याविषयी खेद व्यक्त करताना शाहरुख खान याचा लोकप्रिय चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील, सेनोरिटा, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है... हा सुप्रसिद्ध संवाद उच्चारला आणि सभागृहातील उपस्थितांनी हास्याच्या स्फोटात टाळ््या व शिट्ट्यांनी त्याला मन:पूर्वक दाद दिली.
यावेळी ओबामा यांनी त्यांच्या मागील दौऱ्यादरम्यान हूमायूंच्या मकबऱ्याजवळ भेटलेल्या विशाल नावाच्या मुलाचा उल्लेख करून त्याला शिक्षण दिले जाईल असे नमूद केले. यावेळी विशाल व सत्यार्थी सभागृहात उपस्थित होते.
व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी दिवाळी साजरी करण्यात येत असल्याची माहिती देऊन त्यांनी मागील दौऱ्यात मुंबईतील भांगडा नृत्याचेही स्मरण केले.