८५ विमानांचा संपर्क तुटल्यामुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2016 01:02 AM2016-04-09T01:02:46+5:302016-04-09T01:02:46+5:30
येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.
कोलकाता : येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. पण सुदैवाने त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. अवघ्या १0 मिनिटांसाठीच हे घडले असले तरी त्यामुळे ८५ विमानांशी एटीसीचा संपर्क होत नव्हता. तेथून उड्डाण घेतलेली विमाने आणि तिथे येणारी विमाने त्यामुळे संपर्काशिवाय होती. त्यांना एटीसीकडून कोणत्याही सूचना मिळू शकत नव्हत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब होती. येणारी आणि जाणारी विमाने यांचे नेमके ठिकाण दाखवणारा एटीसीमधील डिस्प्ले बंद पडल्याने हा प्रकार घडला. त्यावेळी कोलकाता विमानतळाच्या नियंत्रण क्षेत्रात ८५ विमाने आकाशात होती.
केंद्र सरकारने आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून, याप्रकरणी अहवाल मागवला आहे. विमानांच्या वाहतुकीची माहिती देणारी यंत्रणा बंद पडल्याने प्रोटोकॉलप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सीद्वारे विमानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती यंत्रणाही बंद पडल्याचं लक्षात आले. कोलकाता विमानतळावरील बीएसएनएल नेटवर्कबंद पडल्याने ही समस्या निर्माण झाली, असे सूत्रांनी सांगितले. इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या या लाईनद्वारे वैमानिकांशी संपर्कसाधून त्यांना इतर विमानांची माहिती दिली जाते. तसेच विमानांमधील सुरक्षित अंतर किती आहे, याचे संदेश दिले जातात. (वृत्तसंस्था)