तीन विद्यार्थिनींच्या आत्महत्येने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 02:01 AM2016-01-25T02:01:42+5:302016-01-25T02:01:42+5:30
अव्वाच्या सव्वा फी व अन्याय्य वागणूक याबद्दल व्यवस्थापनावर दोषारोप करून तामिळनाडूच्या विल्लुपूरम जिल्ह्यातील एका खासगी निसर्गोपचार व योगा महाविद्यालयातील
चेन्नई : अव्वाच्या सव्वा फी व अन्याय्य वागणूक याबद्दल व्यवस्थापनावर दोषारोप करून तामिळनाडूच्या विल्लुपूरम जिल्ह्यातील एका खासगी निसर्गोपचार व योगा महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. टी. मनीषा, ई. सरन्या आणि व्ही. प्रियंका या १९ वर्षांच्या तिघी जणींनी एकमेकींना दुपट्ट्याने बांधून घेऊन कॉलेजच्या आवारातील विहिरीत उड्या मारल्या.
हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाने देशभरात गदारोळ उठलेला असतानाच तामिळनाडूमधील या तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
एसव्हीएस निसर्गोपचार आणि योगशास्त्र या खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील तिन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह शनिवारी रात्री एका विहिरीत सापडले. या विद्यार्थिनींनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठीही सापडली असून, त्यामध्ये अव्वाच्या सव्वा फी वसूल करण्यात आल्याचा व अन्याय्य वागणूक मिळत असल्याचा आरोप करून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला दोषी धरले आहे. व्यवस्थापनाने धक्कादायक निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष शोक्कर वर्मा यांच्या पुत्रालाही अटक केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सामना करीत असलेले हैदराबाद सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव पोदिले हे रविवारपासून रजेवर गेले आहेत. ‘विद्यापीठात रोहित वेमुलाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आपल्याला काही काळाकरिता विद्यापीठ कॅम्पसपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे,’ असे सांगत अप्पा राव रजेवर गेले आहेत.
‘कुलगुरू रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी वरिष्ठ प्राध्यापक विपिन श्रीवास्तव हे २४ जानेवारीपर्यंत विद्यापीठाचे कामकाज सांभाळतील,’ असे विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे. तथापि, अप्पा राव हे नेमक्या किती दिवसांच्या रजेवर गेले आहेत, याचा या वेबसाईटवर खुलासा करण्यात आला नाही.
जेएनयूच्या विद्यार्थ्यांचेही आमरण उपोषण
1 हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या विरोधात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) तीन विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण आरंभिले आहे.
2 सुचिश्री, लेनिनकुमार आणि शेभांशू, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून अन्य विद्यार्थी साखळी उपोषण करणार आहेत.