Corona Virus: शेअर बाजाराला कोरोनाचा डंख; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 04:11 AM2020-02-29T04:11:21+5:302020-02-29T06:55:51+5:30

सलग सहावा दिवस; १४५० अंशांची घसरण; निफ्टीही गडगडला

Sensex tanks 1448 pts on coronavirus jitters worst weekly fall in 10 yrs | Corona Virus: शेअर बाजाराला कोरोनाचा डंख; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

Corona Virus: शेअर बाजाराला कोरोनाचा डंख; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

Next

मुंबई : जगातील अनेक देशांत कोरोनाचा झालेला संसर्ग, जगातील शेअर बाजारांत झालेली घसरण, परकीय वित्तसंस्थांकडून मोठी विक्री आणि मुडीजने घटविलेला जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज यांमुळे मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार घसरण झाली. बाजाराचा निर्देशांक सुमारे १४५० अंशांनी खाली आला. गेले सहा दिवस होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आतापर्यंत बाजारात आज झालेली घसरण दुसऱ्या क्रमांकाची आहे.

बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स ७०० अंशांनी खाली येऊन ३९,०८७.४७ अंशांवर खुला झाला. त्यानंतर तो १५२५ अंशांपर्यंत खाली गेला. बाजार बंद होताना निर्देशांक ३८,२९७.४७ अंशांवर आला. गुरुवारच्या तुलनेमध्ये त्यात १४४८.३७ अंशांनी घट झाली. निफ्टीही ३.७१ टक्के म्हणजेच ४३१.५५ अंशांनी कमी होऊन ११,२०१.७५ वर बंद झाला. सलग सहाव्या दिवशी निर्देशांकांमध्ये घसरण झाली.

मुडीजने घटविला अंदाज
कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसण्याची शक्यता आहे. मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा आगामी वर्षामध्ये २.८ ऐवजी २.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुडीजच्या या अंदाजाचाही जगभरातील शेअर बाजारांवर प्रतिकूल परिणाम झाला. यामुळे एकाच दिवसामध्ये गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कोरोना विषाणूने आता जगालाच आपल्या कवेत घेण्यास प्रारंभ केल्याने जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीने आशियातील सर्वच शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण झाली.
टोकिओ, सिडनी, सेऊल, बॅँकॉक आदी शेअर बाजारांमध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली. याआधी अमेरिका व युरोपमधील शेअर बाजारही घसरले. युरोपातील निर्देशांक चार टक्क्यांनी घसरले.

Web Title: Sensex tanks 1448 pts on coronavirus jitters worst weekly fall in 10 yrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.