कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना वेगळा प्रवेश, युजीसीचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:15 AM2022-03-31T06:15:20+5:302022-03-31T06:15:51+5:30
अतिरिक्त जागा : यूजीसीने सर्व राज्ये व शैक्षणिक संस्थांना लिहिले पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमधून आगामी शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये वेगळ्या जागांची तरतूद केली जात आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव प्रो. रजनीश जैन यांनी सर्व राज्ये व उच्चशिक्षण संस्थांना याबाबत बुधवारी पत्र लिहून ज्या विद्यार्थ्यांच्या आई- वडिलांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांची ओळख निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्व केंद्रीय, राज्य, अभिमत विद्यापीठांसह उच्चशिक्षण संस्था अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देतील. त्यांच्यासाठी वेगळ्या जागांची तरतूद करण्यात आली आहे. या जागा नियमित जागांपेक्षा अतिरिक्त असतील. पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली होती. ज्या बालकांच्या आई- वडिलांचा कोरोना महामारीने मृत्यू झालेला असेल, त्यांच्यासाठी समायोजित पॅकेज देण्यात येईल, असे मोदी म्हणाले होते. याअंतर्गत अशा विद्यार्थ्यांसाठी पीएम केअर योजना सुरू केली.
ओळख निश्चित करण्याचे निर्देश
महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अशांची ओळख निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांना पीएम केअर स्कीम सर्टिफिकेट २०२१ मध्ये उच्चशिक्षणात अतिरिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल.