शहीद कॅप्टनच्या मुलीची वेगळी मोहीम
By admin | Published: February 25, 2017 11:42 PM2017-02-25T23:42:18+5:302017-02-25T23:42:18+5:30
दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) रामजस कॉलेजमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर डीयूची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध (अभाविप) सोशल
जालंधर/नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) रामजस कॉलेजमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर डीयूची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध (अभाविप) सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. या मोेहिमेला ४८ तासांत १,२०० रिअॅक्शन, १,९९१ शेअर आाणि १४३ कमेण्टस् मिळाल्या. गुरमेहर कौैर ही कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मंदीपसिंग यांची मुलगी आहे.
डीयूतील कार्यक्रमात जेएनयू वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले उमर खालीद आणि शहला रशीद यांना आमंत्रित करण्यात आले होते. याला भाजपने विरोध दर्शविला. यातून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे दुखावलेल्या कौरने सोशल मीडियावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे विरोध दर्शविला. तिने आपला प्रोफाइल फोटो बदलून देशभरातील विद्यार्थ्यांना हा फॉर्मेट अवलंबिण्याचे आवाहन केले.
सुरुवातीच्या काही तासांतच कौरच्या मोहिमेला दिल्ली, पंजाब, मुंबई, तसेच देशभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला. जालंधरची रहिवासी असलेल्या कौरने अभाविपची वागणूक क्रूर आणि धक्कादायक असून, हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे तिने म्हटले. प्रोफाईल छायाचित्रात, तिने हाती प्लेकार्ड धरले असून, त्यावर लिहिले आहे : मी दिल्ली विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहे. मला अभाविपची भीती वाटत नाही. मी एकटी नाही. भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे. निरपराध विद्यार्थ्यांवर अभाविपकडून झालेल्या क्रूर हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.
हा विद्यार्थ्यांवरील हल्ला नव्हता, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेल्या लोकशाहीवर होता. हा हल्ला भारतात जन्मलेल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर झाला आहे. या हल्ल्याने आमच्या शरीरावर आघात झाला आहे, पण विचारांवर नाही. हे प्रोफाइल छायाचित्र म्हणजे दहशत पसरविण्याला विरोध दर्शविण्याची माझी पद्धत आहे, असेही तिने म्हटले आहे.
आपल्या विरोधाबाबत कौर म्हणाली की, सुरुवातीला मी या घटनेशी जोडले गेले नव्हते. मात्र, विरोध करणारे विद्यार्थी जखमी झाल्याचे, तसेच विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्यात आल्याचे कळल्यामुळे मला मोठा धक्का बसला. मला माझा विरोध दर्शविण्यासाठी टेक्नॉलॉजी आणि मीडियाचा उपयोग करणे योग्य वाटले. यावरून परिस्थिती किती बिकट आहे हे तुम्हाला समजू शकते.
हा दोन पक्षांचा मुद्दा नाही.
हा विद्यार्थ्यांचा विरोध आहे.
ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही,
जे आपली भूमिका थोपविण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब
करतात त्यांच्याविरुद्धचा हा यलगार आहे, असेही ती म्हणाली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
शांततेवरही संदेश
कॅप्टन मंदीपसिंग कारगिलमध्ये शहीद झाले तेव्हा गुरमेहर केवळ दोन वर्षांची होती. यापूर्वी २०१६ मध्येही कौरने भारत-पाक शांततेवर एक संदेश दिला होता. त्याला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता.