काश्मिरात शांततेसाठी फुटीरवादी नेते नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2015 12:25 AM2015-04-20T00:25:26+5:302015-04-20T00:25:26+5:30
बडगाम जिल्ह्यात पोलीस गोळीबारात एक युवक ठार झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे फुटीरवाद्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाईज उमर
श्रीनगर : बडगाम जिल्ह्यात पोलीस गोळीबारात एक युवक ठार झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे फुटीरवाद्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाईज उमर फारूक यांच्यासह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामुळे रविवारी काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण शांतता दिसली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरवाईज यांना शनिवारी सकाळी नजरकैदेत टाकण्यात आले तर गिलानी गत तीन दिवसांपासून नजरकैदेत आहेत. रविवारी दुपारी यांच्या नेतृत्वाखाली रेसिडेन्सी मार्गावर आंदोलन पुकारले होते. मात्र ते हाणून पाडण्यासाठी या नेत्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागात सोमवारी लष्कराच्या एका मोहिमेत दोन युवक ठार झाले होते. या घटनेच्या विरोधात शनिवारी बडगाम जिल्ह्यातील नरबल येथे निदर्शने करण्यात आली. या हिंसक निदर्शनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुहैल अहमद सोफी नामक युवक मारल्या गेला तर अन्य दोघे जखमी झाले होते. मीरवाईज व गिलानी यांनी या ताज्या घटनेच्या निषेधार्थ बडगाम जिल्हा ‘बंद’चे आयोजन केले होते. (वृत्तसंस्था)