देशात सप्टेंबर महिन्यात जबरदस्त पाऊस, 102 वर्षांचा रेकॉर्ड मोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:25 AM2019-09-30T10:25:22+5:302019-09-30T10:25:39+5:30
यंदा देशभरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे.
नवी दिल्ली : यंदा देशभरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात तर या पावसानं धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे हा पाऊस सप्टेंबरमध्ये 102 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. 1971 या वर्षांनंतर 2019मध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. सप्टेंबर महिन्यात 247.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यंदा देशभरात मान्सून उशिरा दाखल झाला असला तरी त्यानं दमदार कामगिरी केली आहे. जून महिन्यात देशात 33 टक्के कमी पाऊस पडला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत ती कमी पावसानं भरून काढली आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाने गेल्या 25 वर्षांतील सर्व रेकॉर्ड ब्रेक केला आहे, असंही हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं आहे.
देशभरात 1983च्या सप्टेंबर महिन्यात 255.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तत्पूर्वी सप्टेंबर 1917मध्ये 285.6 मिमी पाऊस झाला होता. यंदाच्या वर्षी देशात 247.1 मिमी पाऊस नोंदवण्यात आला होता. हा पाऊस नियमित पावसाच्या सरासरीपेक्षा 48 टक्के जास्त आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही 1901मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर यंदा देशात तिसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे.