मिझोराममध्ये भूकंपांची मालिका; नागरिकांवर रात्री जागून काढण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 10:45 PM2020-07-23T22:45:24+5:302020-07-23T22:45:47+5:30
नागरिकांनी उघड्यावर उभारले तात्पुरते तंबू; कारणे तपासण्याची मागणी
ऐजावल : मिझोराममध्ये मागील महिनाभरात भूकंपाची मालिकाच सुरू असल्यामुळे नागरिकांत प्रचंड दहशत पसरली आहे. भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या म्यानमार सीमेजवळील चंफाई जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिक रात्री जागून काढीत आहेत. अनेकांनी झोपण्यासाठी घराबाहेर तंबू उभारले आहेत. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात भूकंप का होत आहेत, याची तपासणी सरकारने करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
१८ जूनपासून या भागात भूकंप सुरू आहेत. आतापर्यंत लहान-मोठे २२ धक्के बसले आहे. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ ते ५.५ इतकी मोजली गेली आहे. म्यानमार सीमेला लागून असलेल्या चंफाई जिल्ह्याला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय सैतुआल, सियाह आणि सेरचीप हे जिल्हेही हादरले आहेत, असेसूत्रांनी सांगितले.
चंफाई जिल्ह्याच्या उपायुक्त मारिया सीटी झुआली यांनी सांगितले की, भूकंपाच्या भीतीने कित्येक गावांत नागरिकांनी घराबाहेर तात्पुरते तंबू उभारले आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना आच्छादन कापड, पाण्याचे बॅरल, सौर दिवे आणि प्रथमोपचाराची साधने पुरविली आहेत. बिस्किटे आणि इतर पुरवणी खाद्याचा पुरवठाही करण्यात आला आहे. प्रशासनपरिस्थितीवर पूर्ण लक्षठेवून आहे.
उपायुक्तांनी सांगितले की, या महिन्यात चंफाई जिल्ह्याला भूकंपाचे किमान २० धक्के बसले आहेत. जिल्ह्यातील १६ गावांत भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. १७० घरे क्षतिग्रस्तझाली आहेत. काही चर्च आणि कम्युनिटी हॉल्सचेही नुकसान झाले आहे.सूत्रांनी सांगितले की, चंफाई जिल्ह्यातील सर्वाधिक फटका बसलेल्या गावांत डंग्टलांगचा समावेश आहे. गावातील तरुण मदत कार्यात सहभागी आहे. डंग्टलांग यंग मिझो असोसिएशनचे (वायएमए) सहायक सचिव जॉन जोथान्मविआ फनाई यांनी सांगितले की, गावात पाच तात्पुरती शिबिरे उभारण्यात आली आहेत.
भूगर्भ तज्ज्ञांची पथके दाखल
च्अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात भूकंप का होत आहेत, याची तपासणी करण्याची अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारने तिची दखलही घेतली आहे. जून महिन्यात मुख्यमंत्री झोरामथंगा यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे.
च्याशिवाय सततचे भूकंप कशामुळे होत आहेत, याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने राज्याचे भूगर्भ व खनिज संपदा विभागाचे संयुक्त सचिव एच. लालबियाक्किमा यांना चंफाई जिल्ह्यात पाठविले आहे. लालबियाक्किमा हे भूगर्भ शास्त्रज्ञही आहेत.
च् मिझोराम विद्यापीठाच्या भूगर्भ तज्ज्ञांनीही चंफाई जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या आहेत. तज्ञांचे हे पथक भूकंपग्रस्त भागातील विविध ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेत आहे.