श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यांची मालिका
By Admin | Published: July 25, 2015 01:13 AM2015-07-25T01:13:30+5:302015-07-25T01:13:30+5:30
संशयित दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दूरसंचार प्रदात्यांना लक्ष्य बनवून श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी ग्रेनेड हल्ले घडवून आणले. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला.
श्रीनगर : संशयित दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दूरसंचार प्रदात्यांना लक्ष्य बनवून श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी ग्रेनेड हल्ले घडवून आणले. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला.
पहिला ग्रेनेड हल्ला करणनगर येथील एयरसेलच्या कार्यालयावर झाला. सकाळी ११.३० वाजता दोन अज्ञात तरुणांनी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि नंतर ग्रेनेड फोडले. पोलीस येण्याआधीच हे तरुण पसार झाले. त्यानंतर दुसरा ग्रेनेड हल्ला एयरसेल कार्यालयापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या वोडाफोन शोरूमवर करण्यात आला. या
दोन्ही हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
या दोन हल्ल्यानंतर दुपारी ३ वाजता शाहीदगंज भागातील बीएसएनएलच्या मनोऱ्यावर तिसरा हल्ला करण्यात आला. या मनोऱ्यावर ग्रेनेड फेकून मनोरा उडविण्याचा दश्हतवाद्यांचा प्रयत्न होता, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात एक मजूर जखमी झाला. तो आपल्या घरी काम करीत असताना हा ग्रेनेड स्फोट झाला.
दोन महिन्यांपूर्वी काश्मिरात दूरसंचार सुविधांवर असेच ग्रेनेड हल्ले करण्यात आले होते आणि त्यात दोन जण मारले गेले होते, हे येथे उल्लेखनीय आहे. (वृत्तसंस्था)