वरिष्ठ नेत्याकडून शोषण, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 03:15 PM2020-09-24T15:15:01+5:302020-09-24T15:15:22+5:30
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर अध्यक्ष इमरान अलीम सैफी यांनी खराब नियत ठेऊन आपले शोषण केल्याचे फरहान यांनी म्हटले आहे. फरहीन यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या घरी काही गुंडांना पाठवून मारहाण करण्यात आली, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अलीगढ - महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या भारतीय जनता पक्षातीलच महिलांची सुरक्षा धोक्यात असल्याचे दिसून येते. भाजपाच्या महिला पदाधिकारी असलेल्या महिलेने पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. अलीगढ ठाणे क्षेत्रातील देहली गेट परिसरातील उस्मानपाडाच्या रहिवाशी असलेल्या भाजपाच्या महिला अध्यक्षा फरहीन मोहसीन यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर हे आरोप लावले आहेत.
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर अध्यक्ष इमरान अलीम सैफी यांनी खराब नियत ठेऊन आपले शोषण केल्याचे फरहान यांनी म्हटले आहे. फरहीन यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या घरी काही गुंडांना पाठवून मारहाण करण्यात आली, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
फरहीन मोहसीन यांनी सांगितले की, मी 2013 पासून भाजपाची सक्रीय सदस्य असून अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष इमरान अलीम सैफी यांच्यासमवेत महानगराची महिला अध्यक्ष आहे. मी भाजपासाठी काम करत असून काहींना ते पाहवत नाही. त्यामुळे, या लोकांकडून मला सातत्याने या ना त्या मार्गाने त्रास देण्यात येत आहे. माझ्या व्यवसायालाही पूर्णपणे बंद करण्याचं काम याच लोकांनी केलं. गेल्यावर्षी माझ्या पतीसोबत मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर, आता 21 सप्टेंबर रोजीही पुन्हा मला व माझ्या पतीला मारहाण करण्यात आली आहे. इमरान अली सैफीची वाईट नजर माझ्यावर होती. जर, तू माझं ऐकशील तर मी तुला मोठ्या पदापर्यंत पोहोचवले, असे ते म्हणत. मात्र, मी त्यांचं न ऐकल्यामुळे मला त्यांच्या टीममधून बाहेर काढण्यात आलं होतं, असा आरोपही फरहीन यांनी केला आहे.
दरम्यान, पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर ते मला एकटीला बोलावत, माझ्याशी गैरवर्तन करुन नको त्या जागी स्पर्श करत, असेही फरहीन यांनी म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी मला न्याय मिळावा, अशी मागणी पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ई-मेलद्वारे केली आहे.