गुजरात विधानसभेत निवडून आलेल्या 40 आमदारांवर गंभीर गुन्हे; जाणून घ्या, सविस्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:56 PM2022-12-11T23:56:12+5:302022-12-11T23:56:48+5:30

एडीआरच्या म्हणण्यानुसार, 182 नवीन आमदारांपैकी 40 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ज्या 29 आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 20 आमदार भाजपचे आहेत.

Serious crimes against 40 MLAs elected in Gujarat Assembly; Know, in detail... | गुजरात विधानसभेत निवडून आलेल्या 40 आमदारांवर गंभीर गुन्हे; जाणून घ्या, सविस्तर... 

गुजरात विधानसभेत निवडून आलेल्या 40 आमदारांवर गंभीर गुन्हे; जाणून घ्या, सविस्तर... 

Next

40 winning mlas have criminal cases in gujarat 4 mlas have rape and harassment cases says adr report


गुजरात विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांपैकी 40 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या 40 आमदारांपैकी 29 जणांवर खून, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 'असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' (एडीआर) आणि 'गुजरात इलेक्शन वॉच'द्वारे ही माहिती दिली आहे. या माहितीचा आधार नेत्यांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे आहेत, ज्यांच्या विश्लेषणातून ही आकडेवारी समोर आली आहे.

एडीआरच्या म्हणण्यानुसार, 182 नवीन आमदारांपैकी 40 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ज्या 29 आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 20 आमदार भाजपचे आहेत. याशिवाय, काँग्रेसचे 4 आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे 2 आमदार आहेत. या यादीत एका अपक्ष आणि समाजवादी पक्षाच्या आमदाराचाही समावेश आहे.

एडीआरच्या अहवालानुसार गुजरातमधील भाजपच्या 156 आमदारांपैकी 26 जणांवर फौजदारी खटले प्रलंबित आहेत. याचबरोबर, या यादीत काँग्रेसचे 6 आणि आम आदमी पार्टीच्या 5 पैकी 2 आमदारांचा समावेश आहे. या यादीत दोन अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. गुजरातमध्ये समाजवादी पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली असून विजयी आमदाराने आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.

निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या एडीआरच्या अहवालानुसार 2022 च्या विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी खटल्यांचा सामना करणाऱ्या आमदारांची संख्या 2017 च्या तुलनेत कमी आहे. 2017 च्या विधानसभेत 47 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते, जे यावेळी 40 वर आले आहेत. आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून एडीआर आपला अहवाल तयार करते.

तीन आमदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
एडीआरच्या अहवालानुसार, तीन नवीन आमदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भाजपचे एक आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत. यामध्ये काँग्रेसच्या आमदारांमध्ये अनंत पटेल आणि कीर्ती पटेल आणि भाजपचे उना येथील आमदार काळूभाई राठोड यांचा समावेश आहे.

चार आमदारांवर लैंगिक छळ आणि बलात्काराचे गुन्हे  
चार नवीन आमदारांवर लैंगिक छळ आणि बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. यामध्ये भाजप आमदार जेठा भारवाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी, भाजप आमदार जनक तलाविया आणि आम आदमी पार्टीचे आमदार चैतर वसावा यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकल्या
8 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने सलग सातव्यांदा बाजी मारली. भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकल्या. त्याचवेळी काँग्रेसला 17 तर आम आदमी पार्टीला 5 जागा मिळाल्या.
 

Web Title: Serious crimes against 40 MLAs elected in Gujarat Assembly; Know, in detail...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.