Coronavirus Outbreak: चीनमधील वाढत्या कोरोनाबाबत अदर पूनावालांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “रुग्णांमधील वाढ चिंताजनक”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:35 PM2022-12-21T13:35:23+5:302022-12-21T13:36:07+5:30
Coronavirus Outbreak: कोरोनाची वाढती संख्या पाहता चीनमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा लाखांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Coronavirus Outbreak: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधील वाढती रुग्णसंख्या जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चीनसह ब्राझीलमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढल्याचे म्हटले जात आहे. कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झाले आहे. यातच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी भाष्य केले आहे.
कोरोनाचे उगम स्थान मानल्या जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. चीनमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णालयात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. चीनमधील बीजिंग, शांघाय, वुहान, ग्वांगझाऊ, झेंगझोऊ, चोंगकिंग आणि चेंगडू या शहरांमध्ये परिस्थिती अधिक भयावह होत आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता चीनमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा लाखांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचे पालन करा
अदर पूनावाला यांनी एक ट्विट करत कोरोनाचा उद्रेक आणि वाढत्या रुग्णसंख्येबाबत आपले मत मांडले आहे. चीनमधील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. परंतु आपले उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांचे पालन केले पाहिजे, असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एप्रिल २०२० मध्ये कोरोना लसीच्या निर्मितीसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत मिळून काम करण्याची घोषणा केली होती. भारतात जानेवारी २०२१ मध्ये कोव्हिशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. भारतासह अन्य देशांसाठीही सीरमने लसी पाठवल्या होत्या. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी ठरली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"