Serum Institute च्या अदर पूनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 09:14 PM2021-04-28T21:14:29+5:302021-04-28T21:16:00+5:30
अदर पूनावाला यांना संपूर्ण देशात मिळणार सुरक्षा. अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूत देशात तयार करत आहे कोरोना प्रतिबंधात्मक लस.
केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना ही Y दर्जाची सुरक्षा संपूर्ण देशभरात पुरवली जाईल. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली. या अंतर्गत सिक्युरिटी फोर्सेसचे ११ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. यापैकी एक किंवा दोन कमांडोदेखील असतील. सध्या देशात कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड या लसीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून केलं जात आहे.
केंद्र सरकारकडून पूनावाला यांना व्हाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय अशावेळी घेण्यात आलाय जेव्हा १ मे पासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा करणारी कंपनी आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीचा वापर केला जात आहे. या शिवाय भारत बायोटेकही आपल्या कोव्हॅक्सिन या लसीचा पुरवठा करत आहेत. या दोन्ही कंपन्यांची लसीकरण मोहिमेत मोलाची भूमिका आहे.
Ministry of Home Affairs has issued orders to provide Y category security on an all India basis to Serum Institute's Adar Poonawalla; CRPF to provide security to him pic.twitter.com/e7BEcSSeGe
— ANI (@ANI) April 28, 2021
अदर पूनावाला यांना सीआरपीएफद्वारे सुरक्षा पुरवली जाणआर आहे. देशभरात सर्वत्र त्यांना सुरक्षा पुरवली जाणार आहे. बुधवारीच अदर पूनावाला यांनी आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर कमी करणार असल्याची घोषणा केली होती. राज्य सरकारांना आता लसीच्या प्रत्येक डोससाठी ४०० रूपयांऐवजी ३०० रूपये मोजावे लागणार आहेत.