भारतात आता लसीची कमतरता जाणवणार नाही; Serum देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 12:05 PM2021-05-01T12:05:19+5:302021-05-01T12:06:41+5:30
Corona Vaccine : सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण यावरील एक उपाय मानला जात आहे.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेवर ताणही येत आहे. दरम्यान, सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण हा यावरचा रामबाण उपाय मानला जात आहे. आजपासून देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. १८-४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण या टप्प्यात करण्यात येणरा आहे. अनेक राज्यांमधील अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे हे लसीकरण थोडं लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. परंतु लस उत्पादक कंपन्यांवरही काही मर्यादा आहेत. यादरम्यान, कोविशिल्ड (Covishield) या लसीचं उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी आता देशाच्या बाहेरही लस उत्पादन करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
"कंपनी इतर देशांमध्ये अॅस्ट्रॅजेनेका लस तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे," असं 'द टाइम्स'ला शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले. "येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा केली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सीरम इनस्टिट्यूट ऑफ इंडिया भारतात कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करत आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार सीरम इन्स्टिट्यूट जुलै महिन्यापर्यंत आपल्या लसीचे मासिक उत्पादन वाढवून १०० दशलक्ष डोसपर्यंत नेईल, असं अदर पूनावाला यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. यापूर्वी ही कालमर्यादा मे महिन्यापर्यंत सांगण्यात आली होती. सध्या अनेक राज्यांकडून लसीचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसंच यामुळे काही राज्यांमध्ये आजपासून १८-४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरणही होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, पुढील सहा महिन्यांमध्ये सीरम आपल्या लसींच्या उत्पादनाची क्षमता वर्षाला २.५ ते ३ अब्ज डोस इतकी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आज भारतात ४ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.