अधिवेशन संपले; वाद काही संपेना, रण सुरूच
By admin | Published: August 14, 2015 12:55 AM2015-08-14T00:55:43+5:302015-08-14T00:55:43+5:30
ललित मोदीप्रकरणी सरकारने बचावापोटी केलेला युक्तिवाद धुडकावून लावत, काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : ललित मोदीप्रकरणी सरकारने बचावापोटी केलेला युक्तिवाद धुडकावून लावत, काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर जोरदार तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ललित मोदीला भारतात परत आणावे. अन्यथा ते घाबरले, असे म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी मोदींना लक्ष्य केले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्यानंतर राहुल यांनी संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करीत काँग्रेसच्या धरण्याचे नेतृत्वही केले. काँगे्रसच्या या धरण्यात तृणमूल काँग्रेसही सहभागी झाली.
‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशा बाता मारणाऱ्या नरेंद्र मोदींकडे एक चांगली संधी आहे. त्यांनी ललित मोदीला परत आणून क्रिकेटची सफाई करावी. संपूर्ण देश तुम्हाला ही संधी देत आहे. ललित मोदीला परत आणू शकत नसाल, तर तुम्ही घाबरलात, असे आम्हाला समजावे लागेल, असे उपरोधिक ताशेरे राहुल यांनी ओढले.
निवडणुकीदरम्यान आपल्यात धमक असल्याचे तुम्ही सांगितले होते. ती धमक दाखविण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी मंत्र्यांवर आरोप होत असताना, पंतप्रधानांनी संसदेत येऊ नये, हे दुर्दैवी आहे. भूसंपादन विधेयकावर पंतप्रधान घाबरून पळून गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)