अधिवेशन सुरळीत पार पडेल - नरेंद्र मोदी
By admin | Published: November 24, 2014 11:05 AM2014-11-24T11:05:46+5:302014-11-24T13:07:40+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात होत असून हे अधिवेशन सुरळीत पार पडेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. देशातील जनतेने आमच्यावर देशाची जबाबदारी सोपवली असून सरकार व संसदेतील लोकांनी मिळून देश पुढे नेण्याचा प्रयत्न करूया असा संदेश त्यांनी दिला. शांतपणे विचार करून देशहिताचे काम करू असेही मोदींनी सांगितले. संसदेचे हे अधिवेशन परिणामकारक ठरेल व त्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विमा क्षेत्रात अधिक विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारे आणि दीर्घकाळापासून रखडलेले विमा विधेयक तसेच वस्तू व सेवाकर विधेयक सरकारच्या अग्रकमावर आहेत़ कोळसा वटहुकूम आणि वस्त्रोद्योग राष्ट्रीयीकरणासंदर्भातील वटहुकुमाची जागा घेणारी विधेयके पारित करणे, हीसुद्धा सरकारची प्राथमिकता आहे. आजपासून २३ डिसेंबरपर्यंत चालणा-या या अधिवेशनात ३९ विधेयके सादर करण्यासाठी, विचार करण्यासाठी वा पारित करण्यासाठी मांडली जाऊ शकतात, असे संकेत सरकारने दिले आहेत.
तर योजना आयोग संपुष्टात आणण्याची प्रस्तावित योजना, विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याच्या मुद्द्यावर सरकारने केलेले कथित घूमजाव आदी मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची योजना आहे.
दरम्यान दिवंगत माजी सदस्यांना तसेच आज पहाटे निधन झालेले माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहांचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.