चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सीबीआय कोठडीविरोधातील याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 01:06 PM2019-08-26T13:06:56+5:302019-08-26T13:32:44+5:30
पी. चिदंबरम यांची आज सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. पी. चिदंबरम यांना सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तसेच, पी. चिदंबरम यांची आज सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अटक झाल्यानंतर सुनावणी करण्याचा काहीच अर्थ राहत नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले. तर, दुसकीकडे गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पी. चिदंबरम यांनी विदेशात बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांनी या माध्यमातून पैशांचा फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Supreme Court asks P Chidambaram to move regular bail before appropriate court. SC says the petition became infructuous since Chidambaram had been arrested on August 21. https://t.co/p36qgW0jUp
— ANI (@ANI) August 26, 2019
दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय कोर्टाने पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. सीबीआयने गेल्या बुधवारी रात्री उशीरा त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणातील सुनावणीसाठी गुरुवारी पी. चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. पी. चिदंबरम या प्रकरणातील चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचे सांगत सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी 5 दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे सीबीआय कोर्टाने पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती.