साडेसातशे कोटींची उलाढाल होणार ठप्प
By admin | Published: March 25, 2015 09:10 PM2015-03-25T21:10:04+5:302015-03-25T21:10:04+5:30
Next
>सलग तीन सुट्या : धनादेश वटणार पाच दिवसांनंतर नाशिक : आर्थिक वर्षअखेरीसची धामधूम आता जवळपास सर्वच क्षेत्रांत दिसत असून, कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही आर्थिक व्यवहार मात्र अडकून पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बाजारातील कोट्यवधींची आर्थिक उलाढाल किमान पाच दिवस तरी अडकून पडणार आहे.मार्चअखेरीस जवळपास सर्वच स्तरातील व्यावसायिक आणि उद्योजकांचे ताळेबंद पूर्ण होत असतात. त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी धनादेश महत्त्वाचे माध्यम असते. यंदा वर्ष पूर्ण होताना २८ तारखेला शनिवारी रामनवमीची सुटी आणि रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने दोन दिवस बॅँका बंद राहणार आहेत. त्याशिवाय ३१ तारखेला बॅँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. १ तारखेपासून मात्र पुन्हा बॅँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यात १ तारखेला कार्यालयीन कामकाज, २ तारखेला महावीर जयंती, ३ तारखेला गुड फ्रायडे अशा सुट्या आल्या आहेत, तर चार तारखेला शनिवार असल्याने त्या दिवशी पुन्हा अर्धाच दिवस बॅँक सुरू असेल आणि रविवारची पुन्हा सुटी असे सलग पाच दिवस बॅँकांचे कामकाज बंद राहणार असल्याने प्रत्येक दिवशी किमान १५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार असे गृहीत धरल्यास सुमारे ७५० कोटी रुपयांचे व्यवहार या पाच दिवसांत ठप्प होणार आहेत.त्यानंतरही सोमवारी बॅँक उघडल्यानंतर ३१ तारखेला टाकण्यात आलेले धनादेश क्लिअर केले जातील. त्यानंतर सोमवारी धनादेश येण्याचे प्रमाण वाढणार असून, दोन दिवस तरी मोठ्या प्रमाणात धनादेशाचे क्लिअरिंग केले जाईल. व्यवहार सुरळीत३१ तारखेला वर्षअखेर असली तरी ताळेबंदासाठी ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही. त्या दिवशी आम्ही पूर्ण दिवस बॅँक सुरू ठेवणार आहोत. सायंकाळनंतर आमच्या कामाला सुरुवात होईल. १ तारखेला मात्र बॅँकेचे कामकाज बंद राहील. २ आणि ३ तारखेला शासकीय सुटी आहे आणि ४ तारखेला शनिवार असल्याने अर्धा दिवस बॅँकेचे कामकाज सुरू राहील. त्यानंतर पुन्हा रविवारी सार्वजनिक सुटी आहे. या सुटीच्या कालावधीत एटीएममध्ये रक्कम टाकण्याची काळजी घेतली जाईल. फक्त बॅँकांचे व्यवहार बंद राहतील.- बाबुलाल बंब (क्षेत्रीय व्यवस्थापक, स्टेट बॅँक)