मुंबई, पुण्यासह सात शहरांतील घरांच्या आकारमानात २७ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:49 AM2019-09-25T02:49:48+5:302019-09-25T07:07:36+5:30

देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम

Seven cities including Mumbai, Pune have reduced their home size by 5 percent | मुंबई, पुण्यासह सात शहरांतील घरांच्या आकारमानात २७ टक्के घट

मुंबई, पुण्यासह सात शहरांतील घरांच्या आकारमानात २७ टक्के घट

Next

नवी दिल्ली : मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद या सात शहरांतील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत २७ टक्क्यांनी घटल्याचे अ‍ॅनारॉक या स्थावर मालमत्ताविषयक सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे.

या सात शहरांमध्ये २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान १,४०० चौरस फुट होते. यंदाच्या वर्षी हे प्रमाण १०२० चौरस फुट इतके खाली घसरले आहे. मुंबईतील घरांचे सरासरी आकारमान सर्वात कमी आहे. मुंबईत २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान ९६० चौरस फुट इतके होते. त्यात सुमारे ४५ टक्के इतकी घसरण होऊन ते प्रमाण यंदा ५३० चौरस फुटांपर्यंत आले आहे. पुण्यामध्येही ३८ टक्के घसरण होऊन तेथील घरांचे सरासरी आकारमान ६०० चौ. फु. झाले आहे.

अनॅरॉकच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत कमी मागणी असल्याने घरांच्या किंमतीतही फार वाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकांनी लहान आकारमानाची घरे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. देशात सध्या आलेल्या आर्थिक मंदीमुळे स्थावर मालमत्ता तसेच गृहनिर्माण क्षेत्राची स्थिती आणखीन बिकट झाली आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद येथील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत अनुक्रमे ८ टक्के, ९ टक्के व १२ टक्क्यांनी घटले आहे. कोलकातामध्ये सरासरी आकारमानात ९ टक्के घसरण होऊन ते आता १,१२० चौरस फुट झाले आहे.

देशातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ४५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांना सरकारने कमी जीएसटी आकारला आहे तसेच कर्जासंदर्भात काही सवलती दिल्या आहेत. त्याचाही गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम झाला आहे.

Web Title: Seven cities including Mumbai, Pune have reduced their home size by 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.