यज्ञावर सात कोटी स्वाहा
By Admin | Published: December 25, 2015 03:34 AM2015-12-25T03:34:07+5:302015-12-25T03:34:07+5:30
तेलंगणा दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या राज्यातील बहुदा आजवरची सर्वात महागडी महापूजा चालविली आहे
हैदराबाद : तेलंगणा दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या राज्यातील बहुदा आजवरची सर्वात महागडी महापूजा चालविली आहे. त्यांनी आयोजित केलेल्या अभूतपूर्व अशा अच्युत महा चंडी यज्ञावर होणारा खर्च सात कोटी रुपयांच्या घरात आहे.
मेडक जिल्ह्यातील इरावल्ली या गावातील आपल्या फार्म हाऊसवर राव यांनी या यज्ञाचे पौरोहित्य सात राज्यांतील ११०० पुजाऱ्यांकडे सोपविले. २३ डिंसेबरपासृन सुरू झालेली ही पूजा पाच दिवस चालणार आहे. मंत्रोच्चाराच्या घोषात यज्ञ सुरू आहे. दैनंदिन प्रार्थनाही या पुरोहितांकडून पार पाडल्या जात आहेत. राज्यावर दुष्काळाचे संकट असताना अशा प्रकारच्या पूजेवर उधळपट्टी करणे योग्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला असता या यज्ञासाठी राज्याच्या खजिन्यातून एकही पैसा खर्च झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
असा आहे भव्य मंडप....
४० हजार चौरस फूट जागेवर बांबू आणि धानाच्या तणसापासून(काड्या) महा यज्ञशाळा उभारण्यात आली आहे. एकूण १०६ यज्ञकुंडांवर आहुती दिली जात आहे. सकाळी ७ वाजतापासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत ११०० पुजारी ७०० मंत्र एकाचवेळी एकसूरात उच्चारत असल्यामुळे वातावरण भारावून गेले आहे. दुपारी ३.४५ पासून पुन्हा सुरू होणारा मंत्रोच्चार संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालतो.
दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी हा यज्ञ असल्याचे सांगण्यात आले. स्वतंत्र तेलंगणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यास महायज्ञ करण्याचा मानस राव यांनी चार वर्षांपूर्वी बोलून दाखविला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्राचे राज्यपाल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, दोन केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांचे न्यायाधीशही महापूजेला उपस्थित राहणार आहेत.